करवीर निवासिनी अंबाबाई मंदिर परिसरातील अतिक्रमण हटाव मोहीम

कोल्हापूरच्या अंबाबाई मंदिर परिसरातील अतिक्रमण हटवण्यासाठी गेलेले पथक आणि खासगी दुकानदारांमध्ये बाचाबाची झाली. क्षणार्धात या बाचाबाचीचे रुपांतर वादात झाले. आम्ही चप्पल स्टँडची दुकाने हटवणार नाही, असा आक्रमक पवित्रा येथील दुकानदारांनी घेतला. त्यामुळे परिसरात काही काळ तणावाचं वातावरण निर्माण झालं होतं. दरम्यान, पोलिसांनी बळाचा वापर करुन आम्हाला मारहाण केल्याचा आरोप दुकानदार महिलांनी केला आहे.

आम्ही दुकाने हटवण्यासाठी महापालिकेकडे दोन दिवस मुदत मागितली होती. मात्र, अचानक महापालिकेचे पथक आले आणि त्यांनी आमच्या दुकानांवर जेसीबी चालवला. आम्ही याला विरोध केला असता, पोलिसांनी बळाचा वापर करुन आम्हाला मारहाण केली, असा आरोप दुकानदार महिलांनी केला आहे.

कोल्हापूरच्या अंबाबाई मंदिर परिसरात चप्पल स्टँड काढण्यावरुन वाद सुरू झाला आहे. आज सकाळी महापालिकेचं पथक मंदिर परिसरातील दुकाने तसे खासगी दुकानदारांनी लावलेले चप्पलस्टँडचे अतिक्रमण हटवण्यासाठी गेले. यावेळी पालिका पथक आणि चप्पल स्टँडवाल्यांमध्ये झटापट देखील झाली.

दुकाने हटवण्यास विरोध करणाऱ्यांमध्ये महिलांचे प्रमाण जास्त होते. चप्पल स्टँड चालकांनी घेतलेल्या आक्रमक भूमिकेमुळे पोलिसांना बळाचा वापर करावा लागला. महिला पोलिसांनी विरोध करणाऱ्या महिलांना फरफटत तिथून बाहेर काढले. यावेळी महिलांनी मोठा आक्रोश केला.

दरम्यान, कारवाई सुरु झाल्यानंतरही चप्पल स्टँड चालकांनी तो रोखण्याचा प्रयत्न केला, मात्र पोलीस बळासमोर त्यांचे प्रयत्न यशस्वी होऊ शकले नाहीत. यावेळी आपल्यासोबत घडलेला प्रकार सांगताना दुकानदार महिलांना अश्रू अनावर झाले होते. आम्हाला महापालिकेने कोणतीही पूर्वसूचना दिली नाही, असा आरोप चप्पलस्टँड धारक महिलांनी केला.

तसेच आम्ही महापालिकेकडे दुकाने हटवण्यासाठी दोन दिवसांची मुदत मागितली होती. मात्र, आज सकाळीच कोणतीही पूर्वसूचना न देताच महापालिकेचे पथक आले. त्यांनी आमच्या दुकानांवर थेट जेसीबी चालवला. याला आम्ही विरोध केला असता, पोलिसांनी आम्हाला बेदम मारहाण केली, असं म्हणत दुकानदार महिला माध्यमांसोबत ढसाढसा रडल्या.