१० मार्चला कोल्हापूरमधील नव्या विमानतळ इमारतीचे उद्घाटन!

कोल्हापूर येथील विमानतळाच्या नवीन टर्मिनल इमारतीचे उद्घाटन रविवार दि. १० मार्च रोजी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या हस्ते ऑनलाइन पद्धतीने होणार आहे. तर उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस हे या समारंभासाठी कोल्हापूरमध्ये उपस्थित राहणार आहेत.खासदार धनंजय महाडिक यांच्या कार्यालयाकडून ही माहिती देण्यात आली.

सकाळी ११ च्या सुमारास हा कार्यक्रम होण्याची शक्यता आहे.केंद्र शासनाने कोल्हापूरसह अन्य महत्त्वाच्या विमानतळांच्या विकासाचा महत्त्वाकांक्षी प्रकल्प हाती घेतला होता. यामध्ये कोल्हापूरच्या विमानतळाचाही समावेश होता. यासाठी खासदार महाडिक यांनी सातत्याने पाठपुरावा केला होता.

केंद्रीय हवाई वाहतूक मंत्री ज्योतिरादित्य सिंदिया यांनीही त्यांच्या गेल्या वर्षभरातील कोल्हापूर दौऱ्यामध्ये विमानतळाच्या कामाकडे जातीने लक्ष दिले होते. या पार्श्वभूमीवर कोल्हापूरच्या या ऐतिहासिक दिसणाऱ्या इमारतीचे उद्घाटन आता रविवारी होणार आहे.