उजनी धरणातून १० मार्चला सोलापूरसाठी पाणी!

गतवर्षी सरासरीपेक्षा कमी पाऊस झाल्याने जिल्ह्यातील करमाळा, बार्शी, माढा, माळशिरस व सांगोला या पाच तालुक्यांमध्ये दुष्काळ जाहीर झाला आहे. दुसरीकडे उर्वरित सर्वच तालुक्यांमध्ये देखील तशीच चिंताजनक स्थिती आहे. जिल्ह्यातील पाणीपातळी यापूर्वीच सव्वामीटरने खाली गेली असून मार्चमध्येच उन्हाची तीव्रता वाढू लागली आहे.

दोन दिवसांपासून जिल्ह्याचे तापमान ३८ अंशावर गेले असून नवीन लागवड केलेली पिके या तडाख्यात माना टाकत आहेत. जिल्हाधिकाऱ्यांनी जिल्ह्याबाहेर चारा न्यायला बंदी घातली असून सर्व साठ्यांमधील पाणी पिण्यासाठीच राखीव ठेवण्याचे आदेश दिले आहेत.

सोलापूर शहराला पाणीपुरवठा करणाऱ्या औज बंधाऱ्याने तळ गाठला आहे. सोलापूरकरांसाठी आता १० मार्चपासून उजनी धरणातून पाणी सोडले जाणार आहे. साधारणत: दहा दिवस हे पाणी सुरू राहणार असून त्यासाठी साडेपाच टीएमसी पाणी धरणातून सोडावे लागणार आहे.