राज्यात आता थंडी हळूहळू गायब होत चाललीआहे .हवामान विभागाचा माहितीनुसार येणाऱ्या दिवसांत राज्यातील तापमानात वाढ होताना दिसणार आहे. मागील काही आठवड्यात अवकाळी पावसाचा फटका राज्यातील अनेक भागांना बसला. विशेषत: मराठवाडा आणि उत्तर महाराष्ट्रात या पावसामुळे सर्वात जास्त नुकसान झाले. वेस्टर्न डिस्टबर्न्समुळे देशासह राज्याच्या हवामानात मोठा बदल झाल्याचं दिसून येत आहे. याचा परिणाम राज्यातील हवामानात बदल होत असून आता रात्री थंडी, दिवसा उन्हाचे चटके बसायला सुरूवात झाली आहे.
पुणे हवामान विभागाच्या माहितीनुसार, राज्यात पुढील 24 तासांत महाराष्ट्रात हवामान कोरडे राहण्याची शक्यता आहे. पुढील 4-5 दिवसांत महाराष्ट्रात किमान आणि कमाल तापमानात 2-3 अंश सेल्सिअसने हळूहळू वाढ होण्याची शक्यता आहे. पुढील 24 तासांसाठी मुंबई शहर आणि उपनगरांसाठी स्थानिक अंदाज वर्तविण्यात आला आहे. शहर आणि उपनगरात प्रामुख्याने आकाश निरभ्र राहील. कमाल आणि किमान तापमान अनुक्रमे 35अंश सेल्सिअस आणि 21 अंश सेल्सिअसच्या आसपास असेल.
हवामान विभागाच्या माहितीनुसार,नाशिक, जळगावआणि मोहोळ येथे 14. 9 अंश सेल्सिअसच्या सर्वात कमी किमान तापमानाची नोंद झाली. तर सोलापूर येथे 38.6 अंश सेल्सिअस कमाल तापमानाची नोंद झाली आहे.
हवामान विभागाचे म्हणणे आहे की, हिमालयीन भागात लवकरच पाऊस आणि बर्फवृष्टी पुन्हा पाहायला मिळेल. त्यामुळे मार्चमध्येही थंडी कायम राहणार असल्याचे संकेत मिळत आहेत. पुढील 5 दिवसांमध्ये अरुणाचल प्रदेश आणि पश्चिम हिमालयी प्रदेश वगळता देशातील बहुतांश भागात हवामान कोरडे राहील.