पक्षांतर्गत विरोधात संजयकाका हॅटट्रिक साधणार….

लोकसभा निवडणुकीसाठी भाजपच्या दुसर्‍या यादीमध्ये विद्यमान खासदार संजयकाका पाटील यांची उमेदवारी जाहीर झाली.जिल्ह्यात गेल्या काही महिन्यांपासून खासदारांविरोधात पक्षात गटबाजी उफाळून आली होती. त्यामुळे खासदारांच्या उमेदवारीबाबत संभ्रम निर्माण झाला होता, परंतु, पक्षाने पुन्हा संधी दिल्याने खासदार पाटील यांचा निवडणुकीतील मार्ग मोकळा झाला.

दरम्यान, महायुतीतील नेते, पदाधिकारी यांच्यासह कार्यकर्ते बरोबर असल्यानं सांगलीत हॅटट्रिक मारणार असल्याचा विश्वास पाटलांनी व्यक्त केला.मागील आठवड्यात भाजपची पहिली यादी जाहीर झाली होती, त्यानंतर बुधवारी ( 13 मार्च ) दुसर्‍या यादीमध्ये महाराष्ट्रातील 20 उमेदवारांची यादी जाहीर करण्यात आली.

त्यामध्ये सांगलीचा समावेश झाल्याने राजकीय हालचालींना वेग आला आहे. जिल्ह्यात भाजपमधील एक गट संजयकाका पाटील यांना उमेदवारी देऊ नये, अशी मागणी करीत होता. पालकमंत्री सुरेश खाडे हे खासदार संजयकाका यांच्या बाजूने आहेत.

पण, इतर अनेक नेते मंडळींनी काकांना विरोध दर्शविला होता. काही नेते काका सोडून कोणाला पण पक्षाने उमेदवारी द्यावी, अशी मागणी केली होती. मात्र, सार्‍यांनाच धक्का देत पक्षाने पुन्हा विद्यमान खासदार संजयकाका पाटील यांच्यावर विश्वास दाखविला. भाजपने बुधवारी लोकसभा उमेदवारांची दुसरी यादी प्रसिद्ध केली. त्यात मात्र कोल्हापूर वा हातकणंगले मतदारसंघाचा समावेश नाही.