जयंतराव, विश्‍वजित यांची संजय पाटलांसमवेत ‘सेटलमेंट’

राष्ट्रवादीचे प्रदेशाध्यक्ष आमदार जयंत पाटील आणि काँग्रेसचे आमदार विश्‍वजित कदम यांची भाजप खासदार संजय पाटील यांच्यासमवेत ‘सेटलमेंट’ आहे.जिल्ह्यात तिसरे स्वतंत्र नेतृत्व उभारण्याची संजयकाकांची क्षमता नाही, याची खात्री असल्यानेच ते संजयकाकांना पूरक भूमिका घेतात. त्यामुळेच काँग्रेसला सांगलीची जागा मिळवण्याची त्यांची इच्छा नसावी असा आरोप भाजपचे माजी आमदार विलासराव जगताप यांनी केला.

ते म्हणाले, ‘जयंत पाटील हे राज्यातील प्रमुख नेते आहेत. त्यांनी आपल्या मुलासाठी सांगली, हातकणंगलेचा सर्व्हे केला अन्य कुणासाठी का नाही? आपलं जमलं तर जमलं, नाही तर विस्कटून टाकलं, अशी त्यांची भूमिका आहे. तीच अवस्था विश्‍वजित कदम यांची. ते परराज्यात काँग्रेसचे निरीक्षक असतात पण त्यांना आपल्या मतदार संघात उमेदवारी आणता येत नाही, हे दुर्दैवी आहे.