महाविकास आघाडीमध्ये सांगलीच्या जागेवरून राजकारण चांगलंच तापलं आहे. या जागेवर शिवसेना ठाकरे गट आणि काँग्रेसने एकाच वेळी दावा केल्याने ही जागा आता नेमकी कोणाच्या वाट्याला जाणार? याची चर्चा रंगली आहे. ही चर्चा सुरू असतानाच उद्धव ठाकरे याचा उद्या २१ मार्च सांगली दौरा होत आहे .या दौऱ्यामध्ये उद्धव ठाकरे काय बोलणार ?याकडे राजकीय वर्तुळाचे लक्ष लागले असतानाच ठाकरे यांनी घेतलेल्या एका निर्णयाने दोन्ही पक्षामधील वाद निवळणार का? याची सुद्धा चर्चा रंगली आहे.
उद्धव ठाकरे उद्या सांगलीत आगमन झाल्यानंतर प्रथम माजी मुख्यमंत्री कै. वसंतदादा पाटील यांच्या स्मृतिस्थळी जाऊन वसंतदादांच्या समाधीचे दर्शन घेणार आहेत. याबाबतची माहिती शिवसेना उपनेते नितीन बानगुडे पाटील यांनी आज सांगलीमध्ये बोलताना पत्रकार परिषदेत दिली. त्यामुळे सांगलीच्या जागेवरून दोन्ही पक्षामध्ये सुरू असलेला राजकीय वाद निवळणार का? अशी राजकीय वर्तुळात चर्चा रंगली आहे.
शिवसेना ठाकरे गटाकडू सांगलीच्या जागेवर दावा करण्यात आला असून या ठिकाणी डबल महाराष्ट्र केसरी चंद्रहार पाटील यांना उमेदवारी जाहीर केली आहे. यानंतर काँग्रेसमध्ये चांगलीच नाराजी पसरली आहे.कॉंग्रस आमदार विश्वजित कदम यांनी सांगली जागेवर आक्रमक भूमिका घेत कोणत्याच मित्रपक्षाने हक्क सांगू नये, यासाठी टोकाची भूमिका घ्यावी लागली तरी चालेल अशी स्पष्ट भूमिका घेतली आहे. त्यामुळे सांगलीच्या जागेवरून महाविकास आघाडीमध्ये मिठाचा खडा पडतो की काय? अशी सुद्धा शंका येऊ लागली आहे.