स्वबळावर लढण्याची भाषा करणाऱ्या राजू शेट्टींचा सूर बदलला

 भारतीय जनता पक्षाच्या किंवा त्यांच्या मित्रपक्षाचा पराभव व्हावा असं जर का महाविकास आघाडीच्या नेत्यांना वाटत असेल तर त्यांनी हातकणंगले लोकसभा मतदारसंघात उमेदवार उभा करू नये, मविआने मला  पाठिंबा जाहीर करावा, मी पाठिंबा घ्यायला तयार आहे असं स्वाभिमानी शेतकरी संघटनेचे नेते राजू शेट्टी यांनी सांगितलं.

आपण मविआचा पाठिंबा घेऊ पण आघाडीत येणार नाही अशी आपली ठाम भूमिका असल्याचंही त्यांनी स्पष्ट केलं. आम्ही 2015 पासून भारतीय जनता पक्षाच्या विरोधात आहोत. खरं तर या आधीपासूनच आम्ही भाजपचे विरोधक आहोत. त्यामुळे आम्ही भाजपसोबत जाणार नाही, या आमच्या भूमिकेवर देखील आम्ही ठाम आहोत असे शेट्टी म्हणाले.

मागेच स्वाभिमानीच्या राज्य कार्यकारिणीमध्ये  महाविकास आघाडीसोबत असणारे सगळे संबंध तोडण्याचा निर्णय घेतला होता. स्वाभिमानीने इथून पुढे ज्या काही निवडणुका लढवायच्या आहेत स्वतंत्र लढवायच्या हा निर्णय घेतला होता. जवळपास तीन वर्षांपूर्वी  मविआचे प्रमुख शरद पवार यांना आम्ही आघाडी का सोडतोय याबाबत एक नऊ पानी पत्र लिहले होते.

पण त्या पत्राची साधी दखलही मविआने घेतली नव्हती. त्यामुळे मविआ आघाडीमधून  निवडणूक लढवायची नाही, तर स्वतंत्र निवडणूक लढवायची हा निर्णय आम्ही घेतला होता आणितो आजही कायम असल्याचं राजू शेट्टी यांनी स्पष्ट केलं.