जिल्हाभरात सध्या रात्रीच्या अंधारात भिरभिरणाऱ्या ड्रोनमुळे ग्रामस्थांमध्ये भीतीचे वातावरण आहे. चोरांच्या अफवा असल्याने गावोगावी तरुणांनी गस्त घालायला सुरुवात केली आहे.चोरट्यांचा माग काढण्यासाठी त्यांच्याकडून ड्रोन उडवले जात आहेत. पण, सध्या ‘चोरटे परवडले, पण ड्रोनना आवर घाला’, असे म्हणण्याची वेळ ग्रामस्थांवर आली आहे.
धक्कादायक बाब असे खासगी ड्रोन उडविण्यासाठी परवानगी घ्यावी लागते, हे कोणाच्याच ध्यानीमनी नाही.शेकडोंच्या संख्येने ड्रोन जिल्ह्यात वापरले जात आहेत. व्यावसायिक छायाचित्रकारांसोबतच हौशी व्यक्तीही ड्रोन बाळगून आहेत. सर्वसामान्यांच्या, तसेच सार्वजनिक सुरक्षेला हानी पोहोचवू शकणारी ड्रोन सर्वत्र भिरभिरताना दिसतात.
लग्नाचे जंगी सोहळे, जाहीर सभा-समारंभांमध्ये डोक्यावरून भिरभिरणारी ड्रोन्स विनापरवानाच असतात. त्याच्या वापरासाठी परवाना घ्यावा लागतो, याबाबत संयोजकही अनभिज्ञ असतात. तीन वर्षांपूर्वी पोलिसांनी सर्व ड्रोनधारकांना नोटिसा काढल्या होत्या. मात्र, पुढे काय कार्यवाही झाली हे गुलदस्त्यात आहे.