हातकणंगलेत ठाकरेंचे उमेदवार सज्ज!

स्वाभिमानी शेतकरी संघटनेचे प्रमुख राजू शेट्टी (Raju shetti) हे जर महाविकास आघाडीतून लढले नाहीत तर हातकणंगले लोकसभेची जागा ठाकरे गट लढणार असल्याची माहिती सूत्रांनी दिली आहे. ठाकरे गटाकडून हातकंणगले जागेसाठी चेतन नरके (Chetan Narke) आणि माजी आमदार सुजित मिणचेकर (Sujit Minchekar) यांच्या नावाची चर्चा सुरु आहे. 

चेतन नरके हे गोकुळ संघांचे संचालक आहेत तर सुजित मिणचेकर (Sujit Minchekar) हे हातकणंगले विधानसभेचे माजी आमदार आहेत. चेतन नरके यांनी दोन दिवसांपूर्वी मातोश्री येथे उद्धव ठाकरे यांची भेट घेतली होती. राजू शेट्टी हे महाविकास आघाडीचा बाहेरून पाठींबा मागत आहेत तर राजू शेट्टी यांनी महाविकास आघाडीतून लढावं असं महाविकास आघाडीने सांगितलं आहे. नरके यांनी कोल्हापूर लोकसभेतून निवडणुक लढवण्याची देखील ईच्छा दर्शवली होती. परंतु शाहू महाराजांना उमेदवारी देण्यात आली असल्याने हातकंगलेमधून उद्धव ठाकरे यांच्याकडे इच्छा दर्शवली आहे.

हातकणंगले लोकसभा मतदारसंघाची सध्या जोरदार चर्चा सुरु आहे. कारण, या मतदारसंघातून स्वाभिमानी शेतकरी संघटनेचे प्रमुख राजू शेट्टी हे निवडणूक लढवत आहेत. जर राजू शेट्टी महाविकास आघाडीत आले तरच त्यांना ठाकरे गट पाठिंबा देणार असल्याची माहिती सुत्रांनी दिली आहे. मात्र, राजू शेट्टी स्वतंत्र निवडणूक लढवण्याच्या निर्णयावर ठाम आहेत. जर महायुतीचा उमेदवार पराभूत करायचा असेल तर महाविकास आघाडीने मला बाहेरुन पाठिंबा द्यावा अशी मागणी राजू शेट्टींनी केली आहे.

मात्र, राजू शेट्टींनी महाविकास आघाडीत सामील व्हावं अशी मागणी आघाडीच्या नेत्यांनी केलीय. त्यामुळं आता ठाकरे गट राजू शेट्टींच्या विरोधात उमेदवार उतरवण्याच्या तयारीत असल्याची माहिती सुत्रांनी दिलीय. या मतदारसंघातून ठाकरे गटाकडून गोकुळ संघांचे संचालक चेतन नरके आणि सुजित मिणचेकर या दोन नावांची चर्चा आहे.