सोलापूरच्या दिशेने भरधाव निघालेल्या पिकअपने जोराची धडक दिल्याने झालेल्या अपघातात पायी चाललेल्या परप्रांतीय मजूराचा मृत्यू झाला.ही घटना सोलापूर मंगळवेढा या राष्ट्रीय महामार्गावरील बेगमपूर(ता.मोहोळ) गावाजवळ काल बुधवारी रात्री आठ वाजणेचे सुमारास घडली.शामसुंदर रामराज चौहान (वय३५,रा.हरय्या,जिल्हा बस्ती-उत्तरप्रदेश)असे अपघातातील मृत मजुराचे नाव आहे.घटनेनंतर पिकअप चालकाने कांही अंतरावरील महामार्गालगतच्या एका शेतात वाहन थांबविले व तेथून स्वतःचा बचाव करीत पळून गेला . संबधित शेतकऱ्याने आपल्या शेतात संशयितरित्या गाई व वासरांसह उभारलेल्या सदर वाहनाची पोलिसांना माहिती दिली.पोलिसांनी जनावरांसह वाहन ताब्यात घेतले.
याबाबत मिळालेली माहिती अशी : सध्या बेगमपूर येथेच राहत असलेला शामसुंदर चौहान हा उत्तरप्रदेशातील आपल्या सहकाऱ्यांबरोबर मागील काही महिन्यांपासून बेगमपूर भागात बांधकाम व फरशी बसविण्याची कामे करीत होता. महामार्गालगत असलेल्या स्टेट बँकेसमोरील एका खानावळीतून जेवनाचा डबा घेवून जवळच भाड्याने राहत असलेल्या घराकडे निघाला. याचवेळी मंगळवेढ्याच्या दिशेने सोलापूरकडे भरधाव वेगाने निघालेल्या एम एच ०३/६२०३ या क्रमांकाच्या जनावरे घेवून निघालेल्या पिकअपने त्याला जोरदार धडक दिल्याने तो रस्त्यावर कोसळला. डोक्याला जबर मार लागल्याने टोल प्रशासनाच्या रुग्णवाहिकेतून सोलापूर येथील शासकीय रुग्णालयात तातडीने दाखल करण्यात आले.