सुलतानगादेतील तलावाने मार्चमध्येच गाठला तळ..

सुलतानगादे (ता. खानापूर) येथील साठवण तलावातील पाणीपातळीने मार्चमध्येच तळ गाठला आहे.
चार गावांत तीव्र टंचाई टेंभूचे पाणी सोडण्याची मागणी उपसरपंचांचा आंदोलनाचा इशारा खानापूर तालुक्याच्या घाटमाथ्यावरील अग्रणी नदीला सध्या टेंभू योजनेचे पाणी सोडले आहे. सुलतानगादे, बेनापूर, रामनगर, करंजे या गावांसाठी वरदान ठरलेल्या सुलतानगादे साठवण तलावातही पाणी सोडण्याची मागणी होत आहे. या तलावाची पाणीपातळी कमालीची घटली असून आगामी तीन महिने या गावांना भीषण पाणीटंचाईचा सामना करावा लागणार आहे. सुलतानगादेचे उपसरपंच सचिन जाधव यांनी सांगितले की, पाण्यासाठी ग्रामपंचायतीने टेंभूच्या अधिकाऱ्यांना पत्र दिले आहे.

गावाला पाणीपुरवठा करणाऱ्या कूपनलिकेची पाणीपातळी या साठवण तलावावर अवलंबून आहे.सध्या तलावाने तळ गाठला आहे. त्यामुळे ग्रामस्थांना टंचाईचा सामना करावा लागत आहे. हा तलाव पूर्ण आटल्यास मे महिन्यात भीषण टंचाईचा सामना करावा लागणार आहे. त्यामुळे टेंभूच्या पाण्याने तलाव भरून द्यावा. अन्यथा तीव्र आंदोलन छेडावे लागेल. त्यामुळे प्रशासनाने तलावात टेंभूचे पाणी त्वरित सोडावे.