यंदाच्या आयपीएलमध्ये सलग तीन मॅचमध्ये पराभव स्वीकारणाऱ्या मुंबई इंडियन्ससाठी (Mumbai Indians) दिलासा देणारी अपडेट समोर आली आहे. मुंबई इंडियन्सचा हुकमी एक्का आणि आयसीसीच्या टी-20 रॅकिंगमधील पहिल्या स्थानावर असणारा बॅटसमन सूर्यकुमार यादव (Suryakumar Yadav) फिट झाला आहे, अशी माहिती आहे. सूर्यकुमार यादव आता दिल्ली कॅपिटल्स विरुद्ध होणाऱ्या मॅचमध्ये मुंबई इंडियन्सच्या संघात खेळताना दिसेल.
अखेर सूर्याचं कमबॅक?
सूर्यकुमार यादवकडे दक्षिण आफ्रिकेविरुद्ध टीम इंडियाच्या टी-20 टीमच्या नेतृत्वाची जबाबदारी सोपवण्यात आली होती. सूर्यकुमार यादव त्या मालिकेत दुखापतग्रस्त झाला होता. डिसेंबर जानेवारीपासून सूर्यकुमार यादव क्रिकेटपासून दूर आहे. गेल्या काही दिवसांपासून नॅशनल क्रिकेट अकादमीमध्ये सूर्यकुमार यादव दुखापतीतून बरा होण्यासाठी प्रयत्न करत होता. आता सूर्यकुमार यादव फिट असल्याचं वृत्त एक्स्प्रेस स्पोर्टसकडून देण्यात आलं आहे.
आता सूर्यकुमार यादव फिट झाल्यानं मुंबईला देखील दिलासा मिळाला असून मुंबईच्या आगामी मॅचमध्ये सूर्यकुमार यादव संघात असू शकतो. मुंबई इंडियन्सला यंदाच्या आयपीएलमध्ये विजय मिळवता आलेला नाही. गुजरात टायटन्स, सनरायजर्स हैदराबाद आणि राजस्थान रॉयल्स यांच्या विरुद्ध झालेल्या मॅचमध्ये मुंबईला पराभवाचा सामना करावा लागला होता. तिन्ही मॅचमध्ये मुंबईच्या टीमला समाधानकारक कामगिरी करता आली नव्हती. आता मुंबईचा हुकमी एक्का असलेला सूर्यकुमार यादव फिट झाला असून दिल्ली कॅपिटल्स विरुद्ध होणाऱ्या मॅचमध्ये सूर्यकुमार यादव कमबॅक करण्याची शक्यता आहे.