हातकणंगले लोकसभा मतदारसंघात सत्यजित पाटील-सरुडकर यांची महाविकास आघाडीतून शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे गटाकडून उमेदवारी घोषित झाल्याने जयंत पाटील यांची जबाबदारी वाढली आहे.राजू शेट्टी महाविकास आघाडीत न आल्यास आम्हाला दुसरा उमेदवार देण्याशिवाय पर्याय नाही, अशी प्रतिक्रिया जयंत पाटील यांनी या पूर्वी माध्यमांना दिली होती.
त्यामुळे इस्लामपूर विधानसभा मतदारसंघाशी अत्यंत अल्पपरिचय असलेले सत्यजित पाटील यांची पर्यायाने शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे गटाची मदारही जयंत पाटलांच्या खांद्यावर असणार आहे.हातकणंगले मतदारसंघात सत्यजित पाटील – सरुडकर यांच्या उमेदवारीने प्रथमच शाहूवाडी या डोंगराळ मतदारसंघातील उमेदवाराला लोकसभेची निवडणूक लढायची संधी मिळाली आहे.
या पूर्वी या मतदारसंघात शाहूवाडीतून कोणताही उमेदवार निवडणूक लढलेला नाही. त्यामुळे शाहूवाडीच्या उमेदवाराचा कसल्याही प्रकारचा इस्लामपूर विधानसभा मतदारसंघाशी संपर्क नाही. राजू शेट्टी यांचा वाळवा-शिराळा मतदारसंघात पूर्वीपासून चळवळीच्या माध्यमातून संपर्क आहे. तर निवेदिता माने व धैर्यशील माने या मायलेकरांनी या मतदारसंघात चौथ्यांदा निवडणुकीसाठी सामोरे जात आहेत. त्यांचाही या मतदारसंघात बऱ्यापैकी संपर्क आहे.हातकणंगलेतील इस्लामपूर व शिराळा हे दोन्ही मतदारसंघ राष्ट्रवादीचे प्रदेशाध्यक्ष जयंत पाटील यांच्या प्रभावाखाली येतात.
या ठिकाणी काॅंग्रेसचीही बऱ्यापैकी ताकद आहे. शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे यांच्या गटाची ताकद अत्यल्प आहे.त्यामुळे सत्यजित पाटील यांचे शिवधनुष्य या मतदारसंघात जयंत पाटील यांना उचलावे लागणार आहे. या बरोबरच या शिराळा व वाळवा मतदारसंघात राजू शेट्टी व धैर्यशील माने यांनी येथील काही राजकीय नेत्यांशी वैयक्तिक संबंध निर्माण करीत आपले गट तयार केले आहेत.
सरुडकरांना मात्र इस्लामपूर विधानसभा मतदारसंघात प्रत्येक मतदार हा नवीन असणार आहे. त्यामुळे जयंत पाटील यांच्यावर सरुडकरांची जबाबदारी असेल. जयंत पाटील यांना आता या निवडणुकीत आपली सर्व ताकद पणाला लावण्याशिवाय पर्याय उरणार नाही.