इस्लामपूर-बहे रस्त्यावरील राजेबागेश्वरनगर परिसरात केलेल्या कामाचा पगार मागण्यासाठी गेलेल्या एकास चौघांनी दगड आणि लाथाबुक्क्यांनी मारहाण करत जखमी केले. हा प्रकार मंगळवारी सकाळी अकरा वाजता घडला. याबाबत अजय मोतीराम पवार (वय २७, रा. शिरटेकर चाळ, इस्लामपूर) याने पोलिसात फिर्याद दिली आहे.
त्यानुसार, किसन शेटेबा धोत्रे, नितीन शंकर धोत्रे, ऋतुराज महेश धोत्रे आणि शंकर किसन धोत्रे या चौघांविरुद्ध मारहाणीचा गुन्हा नोंद करण्यात आला आहे. किसन धोत्रे यांचा दगड घडवणीचा व्यवसाय आहे. अजय पवार हा त्यांच्याकडे काम करत होता. मंगळवारी सकाळी अजय हा कामाचा पगार मागण्यासाठी गेल्यावर त्यांना चौघांनी मारहाण केली. हवालदार दीपक ठोंबरे अधिक तपास करीत आहेत.