नेर्ले (ता. वाळवा) येथे विश्वात्मक जंगली महाराज आश्रम ट्रस्टच्या वतीने प्रतिवर्षीप्रमाणे रामनवमी महोत्सवानिमित्त हरिनाम सप्ताह व ज्ञानेश्वरी पारायण सोहळ्याचे आयोजन करण्यात आले आहे. यानिमित्ताने दि. १३ ते १७ एप्रिलअखेर विविध कार्यक्रम होणार आहेत. उद्योजक बी. जे. पटेल, योगेश पाटील, सतीश चरापले, संदीप पाटील, सतीश पाटील यांच्या हस्ते सोहळ्यास प्रारंभ होणार आहे. या सोहळ्यामध्ये वाचन, प्रवचन, कीर्तन, भजन आदी धार्मिक कार्यक्रमांचे आयोजन करण्यात आले आहे.
मंगळवार दि. १६ रोजी नेर्ले ते कापूसखेड दिंडी व हिंदमाता दर्शन सत्संग सोहळा आयोजित केला आहे. दुपारी ४ वाजता कर्मवीर विद्यालयाच्या क्रीडांगणावर कुस्त्यांचे मैदान होणार आहे. बुधवार, दि. १७ रोजी राम जन्मकाळ पाळणापूजन सोहळा होणार आहे. सोहळ्यास आत्मा मलिक माउली यांच्यासह परमानंद महाराज, निजानंद महाराज यांच्यासह मान्यवर उपस्थित राहणार आहेत.
दुपारी चार वाजता गावातील प्रमुख मार्गांवरून पालखीची सवाद्य मिरवणूक निघणार आहे. दि. १८ रोजी सकाळी महाप्रसादाने या उत्सवाची सांगता होणार आहे. या सोहळ्यादरम्यान विविध नामांकित किर्तनकारांचे किर्तन होणार असून धार्मिक कार्यक्रमांची भक्तांसाठी पर्वणीच असणार आहे. या सोहळ्याचा भाविकांनी लाभ घ्यावा, असे आवाहन ट्रस्टच्या वतीने करण्यात आले आहे.
