धैर्यशील मानेंना लाखाचे मताधिक्य देऊ…

लोकसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर भाजपच्या वतीने आज पंचगंगा नदीकिनारी आलेल्या वरद विनायक मंदिर परिसरात टिफीन बैठक पार पडली. यावेळी महायुतीचे उमेदवार खासदार धैर्यशील माने यांना एक लाखाचे मताधिक्य देण्याचा निर्धार करण्यात आला.
हातकणंगले लोकसभा मतदारसंघांतर्गत असलेल्या इचलकरंजी विधानसभा मतदारसंघामध्ये राजकीय पक्षांकडून विविध उपक्रम राबविले जात आहेत. भाजपचे प्रदेशाध्यक्ष चंद्रशेखर बावनकुळे यांनी मतदान तारखेपर्यंत भाजपच्या कार्यकर्त्यांना विविध कार्यक्रम दिले आहेत. त्यानुसार बूथप्रमुख, पन्नाप्रमुख आणि पदाधिकारी यांची टिफीन बैठक आयोजित करण्यात आली होती. यावेळी सामुदायिक स्नेहभोजन करण्यात आले.
भाजप प्रदेश उपाध्यक्ष सुरेश हाळवणकर यांनी भेट दिली. यावेळी बूथनिहाय मतदार यादीचे वाचन करण्यात आले. आगामी लोकसभेची प्रचाराची रणनीती यावेळी आखण्यात आली. उमेदवार माने यांना विजयी करण्यासाठी कार्यकर्त्यांनी जोमाने कामाला लागावे, असे आवाहन या वेळी करण्यात आले.