उद्या बुधवारी श्री राम नवमी सर्वत्र साजरी केली जाणार आहे. त्यानिमित्ताने सोलापुरात अनेक कार्यक्रमांचे आयोजन करण्यात आलेले आहे. श्रीराम नवमीनिमित्त पूर्व भाग श्रीराम मंदिरात विविध धार्मिक कार्यक्रमांचे आयोजन करण्यात आले आहे. बुधवार, १७ एप्रिल रोजी दुपारी १२ वाजता श्रीराम जन्मोत्सव व दुपारी दोन वाजता प्रभू श्रीराम आणि सीतामाई यांचा कल्याणोत्सव होणार आहे, अशी माहिती मंदिराचे अध्यक्ष भूपती सामलेट्टी यांनी दिली. अयोध्या येथील प्रभू श्रीरामांची वनवास संपून गेल्या जानेवारी महिन्यात नव्या मंदिरात श्रीरामल्ला विराजमान झाले आहेत.
श्रीराम मंदिरात प्राणप्रतिष्ठापना झाल्यानंतर पहिल्यादांच श्रीराम नवमी होत असून राम भक्तांत उत्साह संचारला आहे. पहाटे साडेपाच वाजता नित्य पूजन, अलंकार पूजा, बालभोग, आरती, त्यानंतर पुष्पार्चना धार्मिक विधी होणार आहे. त्यानंतर विष्णू पंचायतन पूजा होईल. गुलाल कीर्तन झाल्यानंतर दुपारी १२ वा. श्रीराम जन्मोत्सव होणार आहे. सायंकाळी पाच वाजण्याच्या सुमारास रथातून मिरवणूक निघेल. ही मिरवणूक श्रीराम मंदिर ते जोडबसवण्णा चौक, औद्योगिक बँक,राजेंद्र चौक, कन्ना चौक मार्गे दत्त चौक, कुचननगर मार्गे पुन्हा मिरवणूकपूर्व भाग श्रीराम मंदिरात येईल.
कार्यक्रम यशस्वी करण्यासाठी मंदिराचे अध्यक्ष भूपती सामलेट्टी, उपाध्यक्ष रामदास म्हंता, खजिनदार मुरली श्रीराम, सचिव महेश बिरू, विश्वस्त कोंडय्या मेरगु, गोवर्धन चाटला आदी परिश्रम घेत आहेत. याशिवाय सोलापूर शहरातील दाजी पेठ, नवी पेठसह अन्य भागांतील श्रीराम मंदिर आणि हनुमान मंदिरांत श्रीराम नवमी उत्सवाची जय्यत तयारी सुरू आहे.
पूर्व भागातील दत्त मंदिरात सीतामाईचा ओटी भरण विधी होईल. त्यानंतर सीतामाईचे पूर्व भाग श्रीराम मंदिरात आगमन झाल्यानंतर बुधवारी दुपारी दोन वाजता प्रभू श्रीराम आणि सीतामाई यांचा कल्याणोत्सव म्हणजे विवाहसोहळा होईल.
