कामेरी येथे सहापदरीकरण! प्रवाशी रस्त्यावर…..

कामेरी कामेरी (ता. वाळवा) परिसरातील पुणे-बंगळुरू राष्ट्रीय महामार्गावरील स्थानिक नागरिकांना अनेक समस्यांना तोंड द्यावे लागते आहे. सहापदरीसाठी पिकअप शेड, रस्त्यालगतची झाडे हटवल्याने बसथांब्यावरच्या ३५ ते ४० अंश डिग्री तापमानाने प्रवासी अक्षरशः होरपळत आहेत. रस्ता रुंदीकरण गरजेचे असले तरी सध्याच्या तीव्र उन्हाळ्यात त्याची झळ प्रवाशांना बसत आहे.

महामार्ग होण्यापूर्वी वाळवा तालुक्यातील कासेगाव ते कणेगाव दरम्यान रस्त्यालगत असंख्य डेरेदार झाडे होती. मुख्य रस्त्यालगत कामेरी, येडेनिपाणी व इटकरे फाटा येथे राष्ट्रीय महामार्गावर प्रवाशांना थांबण्यासाठी ना झाड, ना शेड, तळपत्या उन्हात एस. टी. बस व खासगी वाहनांच्या प्रतीक्षेत असलेले प्रवासी आणि गावाच्या प्रवेशद्वारासमोर हमखास असणारी मोठी झाडे हीच त्या गावाची ओळख व बाहेरगावी जाणाऱ्या गावातील प्रवाशांसाठी थांब्याची ठिकाणे होती. त्यानंतर झालेल्या महामार्गाच्या चौपदरीकरणात मात्र रस्त्यालगतची कितीतरी मोठी झाडे नाहीशी झाली. आशियाई महामार्गाच्या सहापदरीकरण आराखड्यात निवारा शेडची तरतूद नाही.

त्यामुळे प्रवाशांचा उन्हा पावसापासून बचाव कसा होणार ? हा प्रश्न अनुत्तरीतच राहतो. जमीन हस्तांतरण केलीय, तितके काठोकाठ सेवा रस्त्याचे काम सुरु आहे. परिणामी नव्याने वृक्ष लागवड कोठे करायची, हाही प्रश्न आहेच. त्याशिवाय एसटी किंवा अन्य वाहनाची प्रतीक्षा करणाऱ्या नागरिकांना तर उन्हात तळपत वाहनाची दीर्घकाळ वाट पाहावी लागत आहे.