कोल्हापूर रोडवर एएससी कॉलेज चौकात एसटीच्या धडकेत सेंट्रिंग कामगार जागीच ठार झाला, तर यंत्रमाग कामगार गंभीर जखमी झाला आहे. विनायक नीलकंठ मट्टीकल्ली (वय ४०, रा. हनुमाननगर, इचलकरंजी) असे मृताचे नाव आहे. कृष्णात धोंडीबा रजपूत (वय ५५, रा. जवाहरनगर) या गंभीर जखमीवर कोल्हापुरातील सीपीआर रुग्णालयात उपचार सुरू आहेत. दोघेही भरधाव वेगाने चौकाला वळसा घालून जात होते.
याप्रकरणी एसटी चालक सुनील भैरू गवळी (वय ४९, रा. सह्याद्री हौसिंग सोसायटी, कोल्हापूर) यांच्यावर शिवाजीनगर पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल झाला आहे. पोलिसांतून व घटनास्थळावरून मिळालेली माहिती अशी- सकाळी दहा वाजण्याच्या सुमारास विनायक मट्टीकल्ली व कृष्णात रजपूत हे दोघे एकाच दुचाकीवरून कामासाठी घराबाहेर पडले. दोघे (एम. एच. ०९ सीझेड ४८८१) या दुचाकीवरून पुढे गेले असताना परत शाहू पुतळ्याला वळसा घालून एएससी महाविद्यालयाच्या दिशेने आले. एएससी कॉलेज चौकातून पेट्रोल पंपाकडे वळण घेत असताना कोल्हापूरहून इचलकरंजीत येणाऱ्या एसटीने (एम.एच. ०७ सी ९५६८) दुचाकीला जोराची धडक दिली.
या अपघातात दुचाकी बाजूला फेकली गेली, तर दुचाकीवरील दोघे रस्त्यावर कोसळत डोक्यावर आपटले आणि एसटीखाली सापडले. मट्टीकल्ली यांच्या अंगावरून मागील चाक गेल्याने ते जागीच ठार झाले, तर कृष्णात रजपूत हे गंभीर जखमी झाले. दोघांनाही गंभीर दुखापत झाल्याने रस्त्यावर रक्ताचा सडाच पडला होता. रुग्णवाहिका येण्यास विलंब होत असल्याने काही तरुणांनी दोघांना आयजीएम रुग्णालयात दाखल केले.
कृष्णात यांच्यावर प्राथमिक उपचार करून त्यांना कोल्हापुरातील सीपीआर रुग्णालयात हलविण्यात आले.अपघातानंतर मुख्य मार्गावरील वाहतूक ठप्प झाली होती. पुढे एक तास अन्य मार्गाने ती वळवण्यात आली. याप्रकरणी शंकर मट्टीकल्ली यांच्या फिर्यादीनुसार एसटी चालक सुनील गवळी यांच्या विरोधात पोलिसांनी गुन्हा दाखल केला आहे.