या उन्हाळ्यात साठवणीचे हे हटके पदार्थ नक्की करुन पाहाच…..

पूर्वी उन्हाळा आला की, साठवणीचे पदार्थ करण्याची घरी लगबग असायची. पापड, सांडगी, मसाले, लोणची  असे पदार्थ आपण करतो. पण आता फार कोणी वाळवणीचे पदार्थ घरी करायला पाहात नाही. कारण ते बाहेर रेडिमेड मिळतात. पण आम्हाला अशा काही सोप्या रेसिपीज मिळाल्या ज्या कदाचित तुम्ही वाळवणीचे पदार्थ म्हणून करुन पाहिल्या नसतील. सध्या इंटरनेटवर या रेसिपीजनी धुमाकूळ घातला आहे. म्हणूनच या रेसिपी आम्हाला तुमच्यासोबत शेअर कराव्याशा वाटल्या. मग पाहायच्या का नेमक्या काय रेसिपी आहेत त्या.

कोबी आणि डाळीचे पौष्टिक वडे

साहित्य- 1 ते 2 वाटी हिरव्या मुगाची डाळ,(सालवाली), साधारण अर्धा किलो कोबी, 1 चमचा लसूण, लाल तिखट, हळद, मीठ, जिरे, हिंग

कृती- आदल्या रात्री तुम्हाला डाळ धुवून रात्रभऱ भिजत ठेवा. सकाळी पाणी न घालता डाळ वाटून घ्या.  कोबी बारीक किसून घ्या.

एका परातीत तुम्ही वाटलेली डाळ घ्या. डाळ हाताने चांगली फेटून घ्या. फेटल्यामुळे डाळ हलकी होते. साधारण 2 ते 3 मिनिटे तुम्हाला चांगले फेटून घ्यायचे आहेत.

डाळ हलकी झाल्यानंतर तुम्हाला त्यामध्ये ठेचलेला लसूण, लाल तिखट, जिरे, हिंग, मीठ घाला. त्यात किसलेला कोबी घाला. मिश्रण एकजीव करुन घ्या.

तयार पीठाच्या वड्या प्लास्टिकवर पाडून घ्या. वड्या चांगल्या कुरकुरीत वाळवून घ्या.

तुम्हाला भाजी करायचा कंटाळा आला असेल तर तुम्ही नक्की याची भाजी करु शकता. ही भाजी करणेही अगदी सोपे असते.

उपवासाचे सांडगे

उपवासाचे सांडगेदेखील चवीला तितकेच चांगलेच लागतात.जर तुम्हाला उपवासाला काही वेगळे खायची इच्छा असेल तर तुम्ही अशापद्धतीने सांडगे बनवू शकता. वाचा उपवासाच्या सांडग्यांची रेसिपी

साहित्य- 1 ते 2 वाटी साबुदाणा, 1 मोठा उकडलेला बटाटा, 1 ते 2 कच्चे बटाटे, मीठ, जीर. हिरव्या मिरचीची पेस्ट, पाणी

कृती- प्रथम साबुदाणा रात्रभर भिजत घाला. तुम्ही ज्या पद्धतीने खिचडी करता अगदी त्याचप्रमाणे तुम्हाला साबुदाणा भिजवायचा आहे.

दुसऱ्यादिवशी एका परातीत भिजलेला साबुदाणा घेऊन त्यात उकडलेला बटाटा कुस्करुन घालावा. साबुदाणा बांधता येईल इतकेच त्याचे प्रमाण हवे. जास्त उकडलेला बटाटा घालू नये कारण तो फारसा फुलत नाही.

त्यात मीठ, जीर (उपवासाला चालत असल्यास ), हिरव्या मिरचीची पेस्ट घाला.

तर दुसरीकडे कच्चा बटाटा सोलून तो जाडसर किसून घ्या. वाळवणीच्या किसाप्रमाणे गरम पाण्यात मीठ घालवून तो वाफवून घ्या. पाण्यातून निथळून तो साबुदाण्याच्या मिश्रणात घाला.

मिश्रण एकजीव करा. घट्ट मळण्याची काहीच आवश्यकता नाही. तयार  मिश्रणाचे सांडगे पाडून घ्या.

2 ते 3 दिवस उन्हात वाळवत ठेवा. उपवासाला मस्त तळून कुरकुरीत उपवासाचे सांडगे खा.

(टीप- तुम्ही जास्त प्रमाणात करणार असाल तेव्हा उकडलेला बटाटा किती घालायचा त्याचा अंदाज घ्या. तुम्ही कच्चा बटाटा त्यात जास्त घातला तर चालू शकेल. कारण तो वाळल्यानंतर चांगला क्रिस्पी लागतो.)