इचलकरंजी शहराला शुद्ध पाणी देण्याबाबत राज्य शासन सकारात्मक आहे. सर्वांच्या समन्यवयातून यातून मार्ग काढण्यात येणार आहे. या प्रश्नी राज्य शासन आपली जबाबदारी पूर्ण करेल, असे आश्वासन मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी खासदार धैर्यशील माने यांना दिले.
त्यांच्यासह दूधगंगा अंमलबजावणी कृती समितीचे निमंत्रक विठ्ठल चोपडे यांनी मुख्यमंत्री शिंदे यांची वर्षा निवासस्थानी भेट घेऊन चर्चा केली. याबाबत शासनाकडे प्राप्त झालेल्या अहवालानुसार आढावा घेऊन बैठक लावण्याबाबत जलसंपदा मंत्री तथा उपमुख्यमंत्री देवेंद्र फडवणीस यांना सत्वर कळवण्यात येईल, असेही मुख्यमंत्री शिंदे यांनी यावेळी सांगितले
इचलकरंजी शहरासाठी मंजूर झालेल्या सुळकूड पाणी योजनेबाबत वाद निर्माण झाल्याने याबाबत चर्चा करण्यासाठी ११ सप्टेंबरला मुख्यमंत्री शिंदे यांनी बैठक आयोजित केली होती. पण ही बैठक काही कारणास्तव होऊ शकली नाही.
त्यामुळे रद्द झालेली ही बैठक पुन्हा व्हावी, यासाठी आज खासदार माने व चोपडे यांनी मुख्यमंत्री शिंदे यांची घेतली. यावेळी दुधगंगा नळपाणी योजनेच्या प्रश्नाबाबत त्यांनी सविस्तर चर्चा केली. दूधगंगा धरणातील पिण्याच्या पाण्याचा राखीव साठ्यामधून इचलकरंजी शहरासाठी पाणी योजना मंजूर केली आहे. तथापि, धरणामध्ये असणाऱ्या पिण्याच्या पाण्याच्या साठा उपलब्धतेबाबत काही मंडळींनी शंका उपस्थित केली आहे.
त्याचे निरसन करण्यासाठी शासनाने प्रशासनाकडून अहवाल मागून घेतला आहे. अहवाल शासनास प्राप्त झाला आहे. त्यानुसार प्रथम जलसंपदा मंत्री व अधिकारी यांच्या प्रमुख उपस्थितीमध्ये बैठक घेण्यात येईल. त्यामध्ये पालकमंत्री व इतर सर्व संबंधितांना बोलावून त्यांच्या शंकांचे निरसन करण्यात येईल. त्यानंतर सर्वांच्या समन्वयातून पाणी प्रश्नावर मार्ग काढण्यात येईल, असेही मुख्यमंत्री शिंदे यांनी स्पष्ट केले.