पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि मनसे अध्यक्ष राज ठाकरे पहिल्यांदाच एकाच व्यासपीठावर…..

पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि मनसे अध्यक्ष राज ठाकरे हे पहिल्यांदाच एकाच व्यासपीठावर येणार आहेत. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांची मुंबईत छत्रपती शिवाजी महाराज मैदानात सभा होणार आहे.मुंबईत महायुतीच्या सर्व सहा लोकसभा उमेदवारांसाठी मोदी सभा घेणार आहेत. या सभेला राज ठाकरेही उपस्थित राहणार आहेत.

मुंबईतलं मतदान पाचव्या म्हणजेच शेवटच्या टप्प्यात 20 मे रोजी होणार आहे. प्रचाराच्या तोफा 18 मे रोजी संध्याकाळी थंडावणार आहेत, त्याआधी 17 मे रोजी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांची मुंबईच्या ऐतिहासिक मैदानात सभा होईल, या सभेसाठी राज ठाकरेही येणार आहेत. याच व्यासपीठावरून पंतप्रधान मोदी आणि राज ठाकरे विरोधी पक्षांच्या नेत्यांवर खास करून उद्धव ठाकरेंवर काय बोलणार? याकडे लक्ष लागलं आहे.

मुंबई आणि ठाण्यातल्या उमेदवारांसाठी शिवसेनेकडून मोदींच्या दोन सभांसाठी मागणी करण्यात आली होती.राज ठाकरे महायुतीमध्ये सहभागी होतील, अशा चर्चा मागच्या वर्षभरापासून सुरू होत्या. काहीच दिवसांपूर्वी राज ठाकरे यांनी दिल्लीत जाऊन केंद्रीय गृहमंत्री अमित शाह यांचीही भेट घेतली. तर मनसेच्या गुढी पाडवा मेळाव्यातून राज ठाकरेंनी आपण पंतप्रधान नरेंद्र मोदींसाठी महायुतीला पाठिंबा देत असल्याचं म्हटलं होतं.

सोमवारी पुण्यामध्ये पंतप्रधान नरेंद्र मोदी यांची सभा झाली, या सभेला राज ठाकरे यांचे पूत्र अमित ठाकरेही उपस्थित होते. तर राज ठाकरे 4 मे रोजी कणकवलीमध्ये नारायण राणेंसाठी प्रचारसभा घेणार आहेत. रत्नागिरी-सिंधुदुर्ग मतदारसंघातून नारायण राणे निवडणुकीच्या रिंगणात उतरले आहेत.