या ठिकाणी भूकंपाचा सौम्य धक्का…..

शहरासह नागपूर जिल्ह्यात शुक्रवारी दुपारच्या सुमारास भूकंपाचा सौम्य धक्का बसला. रिश्टर स्केलवर या भूकंपाची तीव्रता २.५ इतकी नोंदविण्यात आली. या घटनेची दिवसभर चर्चा होती.चंद्रपूरचे हवामानतज्ज्ञ व पर्यावरण अभ्यासक प्रा. सुरेश चोपणे यांनी दिलेल्या माहितीनुसार, भूकंपाचे धक्के दुपारी ३ वाजून ११ मिनिटांनी बसले. पारशिवनी तालुक्यातील सिंगोरी आणि हिंगणा येथील झिल्पी तलावाजवळही भूकंपाचे धक्के बसल्याची माहिती आहे. तशी नोंद नवी दिल्ली येथील राष्ट्रीय भूकंप विज्ञान केंद्रात झाली आहे.

धक्का सौम्य असल्यामुळे कुणालाच जाणवला नाही. त्यामुळे कोणतेही आर्थिक नुकसान किंवा जीवितहानी झाली नाही. भूकंपाची खोली अडीच किमी होती. स्थानिक भूगर्भातील हालचालींमुळे धक्का बसू शकतो, असेही प्रा. चोपणे यांनी सांगितले. नागपूर व विदर्भात नेहमीच अधूनमधून असे सौम्य धक्के बसत असतात.

गेल्या २६ मार्च रोजीही नागपूर जिल्ह्यातील हिंगणा व कामठी तालुक्यांना २.८ रिश्टर स्केल इतका धक्का बसला होता. उल्लेखनीय म्हणजे, नागपूर व आजूबाजूचा परिसर भूकंपप्रवण भागांत मोडत नाही. त्यामुळे या भागात सहसा मोठा भूकंप होत नाही. तीन रिश्टर स्केलच्या खालील भूकंप सौम्य स्वरूपाचा मानला जातो.