मंगळवार, दि. ७ मे रोजी आठवडी बाजार बंद राहणार असल्यामुळे शेतकऱ्यांनी माळवं तोडण्याची गरज नाही. या दिवशी माळवं सोडा आणि मतदानासाठी मतदान केंद्रावर शेतकऱ्यांनी यायचे आहे. सांगली जिल्ह्यातील ४० गावांमधील आठवडी बाजार बंद ठेवण्याचे आदेश जिल्हाधिकारी डॉ. राजा दयानिधी यांनी दिले आहेत.
यादिवशी नागरिकांना मतदान करता यावे, कायदा व सुव्यवस्थेचा प्रश्न होऊ नये, यासाठी या सर्व ४० गावांमधील आठवडी बाजार पुढे ढकलण्यात आला असून ९ मे रोजी होणार आहे. मतदान व मतमोजणी शांततेत पार पाडण्याच्या दृष्टीने व सार्वत्रिक सार्वजनिक हिताच्या दृष्टीने कायदा व सुव्यवस्थेचा प्रश्न निर्माण न होता मतदान व मतमोजणी सुस्थितीत पार पाडण्यासाठी जिल्हादंडाधिकारी डॉ. राजा दयानिधी यांनी मंगळवार, दि. ७ मे रोजीचे आठवडी बाजार बंद ठेवले आहेत.
कोणत्याही गावात आणि ग्रामपंचायत हद्दीत आठवडा बाजार भरत असल्यास हा आठवडा बाजार पुढे ढकलण्यात येऊन तो गुरुवार, दि. ९ मे रोजी होणार आहे. तसेच दि. ४ जून रोजीचा आठवडी बाजार बंद करून तो ६ जून २०२४ रोजी भरविण्यात येणार आहे.
