सांगली जिल्ह्यात पाणीटंचाईचे सावट असताना आता अति उष्णतेचा फटका भाजीपाला, फळपिकांना बसतो आहे. तापमान ४० अशांच्या पुढे गेले आहे. यामुळे अपेक्षित फुटवा मिळत नाही. फुलगळ कळी गळ, पिकांची वाढ खुंटली आहे.त्यामुळे भाजीपाल्याच्या उत्पादन ६० टक्के घट होण्याची शक्यता आहे.
तसेच वाढत्या तापमानामुळे दोन महिन्यांपूर्वी लागवड केलेली केळीची रोपेही वाळू लागली आहेत. भाजीपाला उत्पादक शेतकऱ्यांच्या अति उष्णतेमुळे अडचणी वाढल्या आहेत.सांगली जिल्ह्यात सर्वसाधारणपणे ५ हजार हेक्टरवर भाजीपाला, केळी आणि फळांची लागवड केली जाते.
वाळवा, मिरज, कडेगाव, पलूस, विटा, पाच तालुके भाजीपाल्याचे उत्पादन घेण्यासाठी अग्रेसर आहेत. गेल्या पाच ते सहा वर्षांत तासगाव, आटपाडी, कवठेमहांकाळ, जत यादुष्काळी पट्ट्यातही भाजीपाला लागवड वाढली आहे.त्यातच आता अति उष्णतेचा फटका भाजीपाला, फळ पिकांवर बसू लागला आहे.
पाणीटंचाई वाढते तापमान असे दुहेरी संकट शेतकऱ्यांवर आले आहे. तापमानामुळे पिकांची वाढ खुंटली आहे. अपेक्षित फुटवा मिळत नाही. फुलकळी निघण्यास अडथळे निर्माण झाले आहेत. तर काही भागात फुलगळीची समस्याही उद्भवली आहे.
जिल्ह्यातील आष्टा, वाळवा, तुंग, यासह कडेगाव, विटा परिसरांत केळीची मोठ्या प्रमाणात लागवड केली जाते. या भागातील शेतकऱ्यांनी गेल्या दोन महिन्यांपूर्वी केळीची लागवड केली आहे.
परंतु गेल्या पंधरा दिवसांपासून दिवसेंदिवस तापमानात वाढ झाली. यामुळे दोन महिन्यांच्या असणाऱ्या केळीच्या बागा जागीच वाळू लागल्या आहेत. त्यामुळे केळी उत्पादक शेतकरी हवालदिल झाला आहे.