महाराष्ट्रात यंदाच्या लोकसभा निवडणुकीत जागावाटपात सांगलीच्या जागेवरून महाविकास आघाडीत मोठा कलगीतुरा रंगला होता. चर्चेअंती ही जागा शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाकडे गेल्यानंतर काँग्रेस नेते विशाल पाटील यांनी अपक्ष उमेदवार म्हणून निवडणूक लढवण्याचा निर्णय घेतला.
त्यामुळे मविआकडून विशाल पाटलांच्या उमेदवारीसाठी आग्रही असणारे काँग्रेस नेते आणि आमदार विश्वजीत कदम हे या निवडणुकीत काय भूमिका घेतात, याकडे सर्वांचं लक्ष लागलं होतं. कदम यांनी ठाकरेंच्या शिवसेनेचे उमेदवार चंद्रहार पाटील यांच्या प्रचारात सहभाग घेतला असला तरी प्रत्यक्षात त्यांच्या कार्यकर्त्यांनी कोणाला मदत केली, याबाबत संभ्रम व्यक्त केला जात आहे.
अशातच विश्वजीत कदम यांनी नुकत्याच केलेल्या वक्तव्याने या संभ्रमात आणखीनच भर टाकली आहे.दरम्यान, विश्वजीत कदम यांनी आज केलेल्या वक्तव्याने त्यांनी यंदाच्या निवडणुकीत महाविकास आघाडीचा घटक असतानाही अपक्ष उमेदवार विशाल पाटील यांना मदत केली आहे की काय, अशा चर्चांना सांगलीच्या राजकीय वर्तुळात उधाण आलं आहे.