टेम्पोमध्ये गायींची निर्दयीपणे कोंबून वाहतूक,एकावर गुन्हा दाखल

अवैधरित्या जनावरांची वाहतूक केली जात असल्याचे पुन्हा एकदा समोर आले आहे. यात सांगलीच्या काळी खण परिसरात अवैधरित्या १६ गाई व एक म्हैस टेम्पोमध्ये निर्दयीपणे कोंबून वाहतूक करणारा टेम्पो पकडण्यात आला आहे. सांगलीतील गोरक्षकांनी हा टेम्पो पकडला असून टेम्पो जनावरांसह थेट विश्रामबाग पोलिस ठाण्यात आणत जनावरांची सुटका केली आहे. मुक्या जनावरांची अवैधपणे निर्दयीपणे गाडीमध्ये कोंबून वाहतूक करण्याचे अनेकदा समोर आले आहे. कालच वाशीम जिल्ह्यात बैलांची वाहतूक करणारी गाडी पोलिसांनी पाठलाग करून पकडले आहे. यानंतर सांगली जिल्ह्यात पुन्हा गायीची वाहतूक केली जात असल्याचे समोर आले आहे. विशेष म्हणजे गोरक्षकांनी गायीची अवैधपणे होणारी वाहतूक रोखली आहे.

दरम्यान फिर्यादी विनायक येडके हे गोरक्षक संघटनेचे सदस्य आहेत. बुधवारी सकाळी आठ वाजता सांगली कॉलेज कार्नर येथे बोजा असलेले वाहन निदर्शनास आले. यानंतर टेम्पो काळीखण परिसरात थांबविला. टेम्पोच्या पाठीमागील ताडपतरी बाजूला करताच गाडीत जर्सी गाई व म्हैस दिसून आल्या. गाडीत १६ गायी व एक म्हैस दाटीवाटीने कोंबून भरलेली निदर्शनास आले.

यानंतर गोरक्षकांनी जनावरांसह टेम्पो विश्रामबाग पोलिस ठाण्यात आणण्यात आला. पोलिस व गोरक्षकांनी जनावरांची सुटका केली. पशुवैद्यकीय अधिकार्‍यांकडून जनावरांची तपासणी देखील करण्यात आली. याप्रकरणी अस्लम सिकंदर खाटीक (वय ४०, रा. गोर्डे चौक, आष्टा, ता. वाळवा) याच्यावर गुन्हा दाखल करण्यात आला आहे. अधिक तपास विश्रामबाग पोलिस करीत आहेत.