केबल चोरट्यांचा धुमाकूळ! बंदोबस्ताची मागणी

वाळवा तालुक्यातील मसुचीवाडी येथे कृष्णा नदीकाठावर शेतकऱ्यांचे शेतीपंप आहेत. या शेतीपंपाच्या माध्यमातून शेतीला पाणीपुरवठा होतो. या शेतीपंपांसाठी तांबे व अॅल्युमिनियमच्या केबल वापरल्या जातात. या केबल चोरी करण्याचा सपाटा चोरट्यांनी लावला आहे. यामुळे शेतकरी चिंताग्रस्त आहेत. पोलिसांनी या चोरट्यांचा बंदोबस्त करावा, अशी मागणी होत आहे.
गेल्या आठवड्यापासून आठ ते दहा शेतकऱ्यांच्या केबल चोरीला गेल्या आहेत.

दोन दिवसांपूर्वी मसुचीवाडी येथील शेतकरी वसंत राजाराम कदम यांची तब्बल दोनशे मीटर केबल चोरट्यांनी लंपास केली. यामुळे कदम यांचे अंदाजे ७ हजार रुपयांचे नुकसान झाले आहे. गेल्या आठवडाभरात सुमारे ७० ते ८० हजारांच्या केबल चोरीस गेल्या आहेत. या चोरीच्या सत्राने ऐन उन्हाळ्यात शेतीला पाणीपुरवठा करणे शेतकऱ्यांना जिकिरीचे बनत आहे.

अनेक शेतकऱ्यांची उभी पिके वाळण्याची भीती निर्माण झाली आहे. पोलिसांनी या चोरट्यांचा बंदोबस्त करावा, अशी मागणी होत आहे. शेतीपंपाच्या केबल लंपास होत असल्याने ऐन उन्हाळ्यात पिकांना पाणी देण्यात शेतकऱ्यांना अडचण येत आहे. त्यामुळे चोरट्यांचा बंदोबस्त करावा अशी भागणी होत आहे.