दुचाकीवरून पडल्यामुळे आष्टा येथील महिला ठार…

अपघातांच्या प्रमाणात दिवसेंदिवस खूपच वाढ झाल्याचे चित्र आपणाला पहायला मिळतच आहे. अनेकांना आपले प्राण यामुळे गमवावे लागले आहेत. वठार तर्फ वडगाव (ता. हातकणंगले) यैथील चौकात दुचाकीवरून तोल जाऊन पडल्यामुळे महिला जागीच ठार झाली. ही घटना वठार येथील चौकात घडली.जयश्री सुनील काळोखे (वय ४० रा. बारा भाकरी मसोबा मंदिराजवळ, आष्टा) असे ठार झालेल्या महिलेचे नाव आहे.

रात्री उशिरापर्यंत वडगाव (ता. हातकणंगले) पोलिस ठाण्यात अपघाताची नोंद झालेली नव्हती. आष्टा पोलिस ठाण्यात अपघाताची नोंद आकस्मिक मृत्यू अशी नोंद झाली आहे. याबाबत घटनास्थळावरून मिळालेली माहिती अशी, मृत जयश्री काळोखे काल दुपारी त्यांचा मुलगा विशाल (वय २४) याच्या दुचाकी (एमएच १० बीव्ही ९१३१) वरून वठारकडून आष्ट्याकडे येत होत्या.

वठार (ता. हातकणंगले) येथील चौकात तोल जाऊन त्या दुचाकीवरून पडल्या. डोकीला जोरदार मार लागल्यामुळे त्या जागीच ठार झाल्या. मुलगा विशाल याने अपघाताची माहिती दिल्यानंतर नातेवाइकांनी त्यांना उपचारासाठी आष्टा येथील ग्रामीण रुग्णालयात दाखल केले असता डॉक्टरांनी मृत घोषित केले. आष्टा ग्रामीण रुग्णालयात शवविच्छेदन करण्यात आले. जयश्री यांच्या मागे पती व दोन मुलगे असा परिवार आहे.