गुंतवणुकीचे अनेक फंडे अन् फसवणूक हे काही सोलापूरसाठी नवीन नाही. मोबाईलवर फसवणूक कशी होते, फसलेल्या लोकांची स्थिती काय, यावर सविस्तर माहिती असतानाही लोक अजूनही सायबर गुन्हेगारांच्या आमिषाला बळी पडत आहेत, हे विशेषच.१ जानेवारी ते २८ मे या चार महिन्यात सोलापूरच्या सायबर पोलिसांकडील प्राप्त तक्रारींनुसार जवळपास ५० ते ५५ जण एकूण दोन कोटी रुपयाला फसले आहेत. कमी दिवसात जास्त पैसा कमवून श्रीमंत व्हाल, असे आमिष दाखवून सायबर गुन्हेगार सावज शोधत असतात. त्यासाठी सायबर गुन्हेगार सतत वेगवेगळे फंडे वापरतात.
सोशल मीडियासह फोनवर मेसेज किंवा लिंक पाठवून, ॲप डाऊनलोड करायला सांगून नागरिकांना आपल्या जाळ्यात ओढण्याचे काम सायबर गुन्हेगार करतात. सुरवातीला काही रक्कम गुंतवल्यानंतर समोरील व्यक्तीचा विश्वास संपादन होईपर्यंत तातडीने मोजक्या रकमेचा परतावा दिला जातो. आपण लगेच त्यावर विश्वास ठेवून जास्त रक्कम गुंतवतो. आपल्याला आपण गुंतवलेली रक्कम व मिळणारा नफा ऑनलाइन दिसतो, पण तो काढता येत नाही.
ज्यावेळी काही लाख रुपये आपल्या खात्यातून जातात, त्यावेळी आता बस जेवढी रक्कम मिळेल तेवढी द्या, असे ज्यावेळी आपण म्हणतो तेव्हा समोरील अनोळखी व्यक्ती आणखी पैसे मागतो अशीही काही उदाहरणे समोर आली आहेत. त्यामुळे नागरिकांनी घाई, आमिष व अपुरे ज्ञान या तीन गोष्टी कायमस्वरूपी लक्षात ठेवाव्यात आणि त्यापासून दूर राहावे असे आवाहन सायबर पोलिसांनी केले आहे.