दसरा महोत्सवाच्या पार्श्वभूमीवर येथील राष्ट्रीय स्वयंसेवक संघाच्यावतीने शिस्तबद्धरित्या संचलन करण्यात आले. शहरातील चार भागात निघालेल्या संचालनाचे ठिकठिकाणी पुष्पवृष्टी करून स्वागत करण्यात आले. तर संचलन पाहण्यासाठी नागरीकांनी रस्त्याच्या दुतर्फा मोठी गर्दी केली होती.
इचलकरंजीत दसरा महोत्सवाच्या पार्श्वभूमीवर राष्ट्रीय स्वयंसेवक संघाच्यावतीने दरवर्षी पथ संचलनाचे आयोजन केले जाते. यावर्षीही शहरातील महादेवनगर, बालाजीनगर, श्री संभाजीनगर, श्री शिवाजीनगर या चार नगरातून संचलनाचे आयोजन केले होते. त्यानुसार महादेवनगर नामदेव भवन, – बालाजीनगर मुसळे हायस्कूल, श्री संभाजीनगर कुमार विद्यामंदिर (कोरोची), तर श्री शिवाजीनगरचे यशवंत मंगल कार्यालय येथे एकत्रीकरण करण्यात आले होते.
ध्वजपूजन आणि प्रार्थनेने या संचलनाला प्रारंभ झाला. संचलनाच्या प्रारंभी स्वयंसेवक, मध्यभागी भगवा ध्वज घेतलेला आश्वारुढ स्वयंसेवक, त्यानंतर घोष तर त्यापाठोपाठ शिस्तबद्ध चाललेले स्वयंसेवक यांचा समावेश होता.