इचलकरंजीत दमदार पावसामुळे गटारीतील कचऱ्यासह सांडपाणी रस्त्यावर…..

मान्सूनचे आगमन झालेले आहे.अनेक भागात पाऊस हजेरी लावत आहे. त्यामुळे शेतकऱ्यांना दिलासा मिळालेला आहे. काही ठिकाणी रिपरिप तर काही ठिकाणी जोरदार पाऊस हजेरी पहायला मिळत आहे. मान्सूनच्या पावसाचे आगमन इचलकरंजीत देखील झालेले आहे. शुक्रवारपासून सुरु झालेल्या दमदार पावसामुळे इचलकरंजी शहरातील सकल भाग व मैदानांना अक्षरश तळ्याचे स्वरुप आले आहे. बहुतांश झोपडपट्टीतील घरांमध्ये गटारीचे पाणी शिरल्याने नागरिकांची मोठी तारांबळ उडाली आहे.शनिवारी दुपारपासून पावसाचे वातावरण निर्माण झाले होते. सायं. ५.३० वा. पावसाने जोरदार हजेरी लावत तासभर अक्षरश: धुमाकूळ घातला.

थोरात चौक परिसर, श्रीपादनगर, को. मलाबादे चौक ते महात्मा गांधी पुतळा, चांदणी चौक, विकली मार्केट परिसर, जिम्नॅशियम मैदान यासह अन्य ठिकाणच्या रस्त्यांना पावसाचे पाणी साचून तळ्याचे स्वरुप आले आहे. रस्त्याकडेला विनाकारण घातलेल्या पेव्हिंग ब्लॉकमुळे पाण्याचा निचरा होण्यास मार्ग नसल्याने रस्त्यांचे तळे बनत आहे.

गटारीमध्ये मोठ्या प्रमाणात टाकण्यात येत असलेल्या कचऱ्यांमुळेअनेक ठिकाणी गटारी तुंबल्या होत्या, तर अनेक भागात गटारीतील कचऱ्यासह सांडपाणी रस्त्यावर आल्याने सर्वत्र कचरा पसरल्याचे दिसून आले.