भाजपचे ज्येष्ठ नेते नरेंद्र मोदी आज तिसऱ्यांदा पंतप्रधानपदाची शपथ घेत आहेत. त्यांच्या मंत्रिमंडळात कुणाकुणाला संधी मिळते याबाबत उत्सुकता आहे. पण उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या नेतृत्वातील राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाला केंद्रीय मंत्रिमंडळात एकही जागा मिळणार नसल्याचं आता स्पष्ट झालं आहे. भाजपचे महाराष्ट्रातील प्रमुख नेते तथा राज्याचे उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी याबाबत मोठा खुलासा केला आहे.
मंत्रिमंडळाच्या विस्ताराबाबत किंवा मंत्रिमंडळात कुणाला स्थान द्यावं यासाठी राष्ट्रवादीच्याबाबत पडद्यामागे काय-काय घडलं? याचं सविस्तर विश्लेषणच देवेंद्र फडणवीस यांनी केलं आहे. देवेंद्र फडणवीस यांनी याबाबत दिलेल्या प्रतिक्रियेतून अजित पवार गटाला केंद्रीय मंत्रिमंडळात सध्या एकही जागा मिळणार नाही हे स्पष्ट झालं आहे.राष्ट्रवादी काँग्रेसला आमच्यावतीने तथा सरकारच्या वतीने एक जागा ऑफर करण्यात आली होती.
राज्यमंत्री स्वतंत्र प्रभार अशाप्रकारची जागा त्यांना देण्यात आली होती. पण त्यांचा आग्रह असा होता की, आमच्याकडून खासदार प्रफुल्ल पटेल यांचं नाव फायनल आहे. ते आधी मंत्री राहिलेले आहेत. त्यामुळे आम्हाला त्यांना आम्हाला राज्यमंत्री स्वतंत्र प्रभार हे करता येणार नाही. मात्र, आपल्यालादेखील कल्पना आहे की, जेव्हा युतीचं सरकार असतं तेव्हा त्यावेळी काही निकष तयार करायचे असतात. कारण अनेक पक्ष तेव्हा सोबत असतात. त्यामुळे एका पक्षाकरता तो निकष मोडता येत नाही”, अशी प्रतिक्रिया देवेंद्र फडणवीस यांनी दिली.