राज्यातील सव्वा दोन कोटी वीज ग्राहकांसाठी महावितरणने स्मार्ट म्हणजेच प्रीपेड मीटर बसविण्याची तयारी सुरू केली असून त्यासाठीची २७ हजार कोटी रुपयांची मीटर्स खरेदीची निविदा प्रक्रिया पूर्ण झाली आहे. मात्र, या स्मार्ट प्रीपेड मीटर बसविण्यास राज्यातील वीज ग्राहकांनी तीव्र विरोध करण्याचा निर्णय घेतल्याने महावितरणची ही योजना वादाच्या भोवऱ्यात अडकण्याची शक्यता आहे.
महावितरणच्या वतीने राज्यातील काही भागात ही मीटर बसवली आहेत. परिणामी, प्रतियुनिटला ३० पैसे दरवाढ लादली जाऊ शकते. या स्मार्ट मीटरचा उपयोग मोठा वीज वापर असणारे उच्च दाब वीज ग्राहक वगळता इतर सामान्य, घरगुती, व्यापारी ग्राहकांना होणार नाही. उत्तर प्रदेश, बिहार, हरयाणा, राजस्थान या राज्यांत अशी मीटर्स बसविली असून त्या ठिकाणी वीज ग्राहकांची बिले दुप्पट तिप्पट होण्याच्या व तांत्रिक कारणाने हजारो ग्राहकांचा वीज पुरवठा खंडित होण्याच्या तक्रारी वाढल्या आहेत.
त्यामुळे वीज ग्राहकांनी महावितरणच्या या स्मार्ट प्रीपेड मीटर योजनेला तीव्र विरोध करण्याचा निर्णय घेतला आहे. त्या पार्श्वभूमीवर विटा येथील वीज ग्राहक संघटनेचे सदस्य किरण तारळेकर यांनी याबाबतचे तक्रारी अर्ज विटा यंत्रमाग संघात जमा करण्याचे आवाहन वीज ग्राहकांना केले आहे.
