उद्धवसेनेचा काँग्रेसला इशारा…..

सांगली जिल्ह्यातील काँग्रेसचे नेते विधानसभा मतदारसंघाचे गणित मांडू लागले आहेत. या दोन्ही काँग्रेसच्या नेत्यांना प्रचंड अहंकार आहे. त्यांनी आपला अहंकार बाजूला ठेवावा, अन्यथा उद्धव बाळासाहेब ठाकरे शिवसेना पक्ष जिल्ह्यातील सर्व आठही विधानसभेच्या जागा लढवेल, असा इशारा उद्धवसेनेचे जिल्हाप्रमुख संजय विभुते यांनी दिला.जिल्हाप्रमुख विभुते म्हणाले, सांगलीची जागा अपक्षाला त्यांच्या एकट्याच्या ताकदीवर मिळाली नाही.

भाजपचे नेते माजी आमदार विलासराव जगताप, अजितराव घोरपडे, पृथ्वीराज देशमुख, खानापुरात शिंदेसेनेच्या गटाने संजय पाटील यांची हुकुमशाही संपविण्यासाठी अपक्षाला मदत केली. संजय पाटील यांना त्यांची जागा दाखविली. मात्र, महाविकास आघाडीत गद्दारी करून सांगलीची जागा जिंकल्यानंतर काँग्रेसला आभाळ ठेंगणे झाल्यासारखे वाटू लागले आहे.

दोन्ही काँग्रेसचे नेते जागांबाबत घोषणा करीत आहेत. परंतु, महाविकास आघाडीत शिवसेना (उबाठा) पक्षही दर आहे. याची त्यांनी जाणीव ठेवावी.राज्यात काँग्रेसला नव्याने मिळालेल्य खासदारकीच्या जागा उद्धव ठाकरे, आदित्य ठाकरे (Uddhav Thackeray) यांच्या झंझावाती प्रचारामुळे मिळाल्या आहेत. त्यामुळे सांगली जिल्ह्यात खानापूर सांगली व मिरज या तीन जागा शिवसेनेला सोडाव्यात. उर्वरित पाच जागांवर दोन्ही काँग्रेसने आपसात चर्चा करून प्रश्न सोडवावा, अन्यथा सर्व आठ जागांवर उद्धवसेना निवडणूक लढवेल, असा इशाराच शिवसेनेच्या ठाकरे गटाने दिला.