इचलकरंजीत रेकॉर्डवरील गुन्हेगाराची दहशत……

गेल्या काही दिवसांपासून कोल्हापूर जिल्ह्यामध्ये सोशल मीडियाच्या माध्यमातून खुन्नस देण्याचे प्रकार सुद्धा वाढीस लागले आहेत. खुन्नस देण्यातून खून होण्यापर्यंत मजल गेली आहे. त्यामुळे या घटनांना कुठेतरी पायबंद घालण्याची मागणी सातत्याने होत आहे. कोल्हापूर शहरासह जिल्ह्यामध्ये गुन्हेगारांचा हैदोस सुरूच आहे.

रेकॉर्डवरील गुन्हेगारांकडून हत्यांची मालिका सुरू असताना आता इचलकरंजीमधील सुद्धा भयंकर व्हिडिओ समोर आला आहे. इचलकरंजीमधील रेकॉर्डवरील गुन्हेगाराने चार तरुणांना बेदम मारहाण केल्याचा भयंकर व्हिडिओ सोशल मीडियात व्हायरल झाल्याने एकच खळबळ उडाली आहे. हा आरोपी मोक्यातून सुटलेला रेकॉर्डवरील गुन्हेगार आहे. गुंड श्याम लाखेचा हा व्हिडिओ आहे.

व्हायरल व्हिडिओमध्ये तरुणाचे इतरांनी हात पाय धरले असून श्याम लाखे बेदम मारहाण करताना दिसून येत आहे. या घटनेनंतर इचलकरंजीमध्ये संतापाची लाट पसरली आहे. लोखंडी सळीने श्याम लाखे मारहाण करताना दिसून येत आहे. या मारहाण प्रकरणात सात जणांवर गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

दहशत कायम राहावी यासाठीच हा व्हिडिओ व्हायरल केल्याचा सुद्धा तपासामध्ये समोर आलं आहे. त्यामुळे आता गुन्हेगारांकडून एक प्रकारे पोलिसांनाच आव्हान देण्यात आलं आहे का? अशीच परिस्थिती या व्हायरल व्हिडिओमधून समोर येत आहे.