इचलकरंजीत कुपनलिकांची दुरावस्था खूपच झालेली आहे. शहरातील विविध भागातील कुपनलिका बंद पडल्याने नागरिकांना पाण्यासाठी वणवण करावी लागत आहे. या संदर्भात अनेक भागातून नागरिकांनी व भागातील लोकप्रतिनिधींनी आमदार प्रकाश आवाडे यांच्याकडे बंद अवस्थेतील कुपनलिकांची दुरुस्ती करुन पाण्याची सोय करून देण्याबाबत मागणी केली होती. या कामी माजी जिल्हा परिषद सदस्य डॉ. राहुल आवाडे यांनीही विशेष प्रयत्न केले.
इचलकरंजी महानगरपालिका हद्दीतील प्रदीर्घकाळापासून बंद पडलेल्या कुपनलिकांची दुरुस्ती आमदार प्रकाश आवाडे वतीने स्वखर्चातून करून देण्यात येत आहे. त्यानुसार जामदार गल्ली, यशवंत कॉलनी, सुर्वेनगर परिसरातील बंद कुपनलिकांच्या मोटारी काढून त्या दुरुस्त करण्यात आल्या. त्या कुपनलिका माजी जिल्हा परिषद सदस्य डॉ. राहुल आवाडे यांच्या हस्ते व भागातील नागरिकांच्या उपस्थितीत पूर्ववत सुरु करण्यात आल्या. भागात कायमस्वरूपी पाण्याची सोय केल्यामुळे नागरिकांतून समाधान व्यक्त होत आहे.