लोणावळ्यात संध्याकाळी सहानंतर पर्यटकांसाठी संचारबंदी!

लोणावळ्यातील(Lonavala) धबधब्यात अन्सारी आणि सय्यद कुटुंबीय वाहून गेल्यानं पर्यटकांच्या सुरक्षेचा प्रश्न पुन्हा एकदा ऐरणीवर आला आहे. याचअनुषंगाने थेट मुख्यमंत्री एकनाथ शिंदेंनी कठोर कारवाईचे आदेश दिलेत. संध्याकाळी सहानंतर पर्यटकांना पर्यटनस्थळी फिरण्यास मज्जाव करण्यात आलंय.

याकडे दुर्लक्ष करणाऱ्या पर्यटकांना आणि कारवाईत हलगर्जीपणा करणाऱ्या अधिकाऱ्यांवर ही बडगा उगारला जाणार आहे, असं पुण्याचे जिल्हाधिकारी सुहास दिवसेंनी जाहीर केलंय. पुढच्या काही तासांत लोणावळ्यातील पर्यटनासाठी विशेष नियमावली जाहीर केली जाणार असल्याचं ही जिल्हाधिकाऱ्यांनी स्पष्ट केलं.

लोणावळ्यातील पर्यटनासाठी विशेष नियमावली जाहीर करणार आहे. लोणावळा, खंडाळा परिसरातील निसर्गसौंदर्य हे पावसळ्यात पर्यटकांना भुरळ पडत आहे. त्यामुळे विकेंडच्या दिवशी मोठ्या प्रमाणात पर्यटकांची गर्दी होत आहे. पुणे-मुंबईसह लगतच्या भागातून नागरिक या ठिकाणच्या विविध पॉईंटवर गर्दी करत आहेत.

मात्र, पर्यटकांनी जिल्हा प्रशासन आणि पोलिसांनी नेमून दिलेल्या सूचनांचे पालन करणे आवश्यक आहे, अन्यथा पोलिसांनी कारवाईचा इशारा दिला आहे. अपघात, पाण्यामध्ये तरुणाचा अतिउत्साह आणि व्हीडीओ आणि रिलीज या नादात घातपात होण्याची शक्यता लक्षात घेता सुरक्षेच्या दृष्टीने उपाययोजना करण्यात आली आहे.