उत्तर प्रदेशातील हाथरस जिल्ह्यात एका सत्संगादरम्यान मोठी दुर्घटना घडली. या ठिकाणी चेंगराचेंगरीत 121 पेक्षा जास्त जणांचा मृत्यू झाला आहे. मृतांचा आकडा वाढण्याची शक्यता आहे. नारायण साकार हरी उर्फ भोले बाबा यांच्या सत्संग दरम्यान चेंगराचेंगरी झाली. या दुर्घटनेनंतर मुख्यमंत्री योगी आदित्यनाथ यांनी चौकशीचे आदेश दिले आहेत. ते स्वत: घटनास्थळी पोहचले आहे. आता ही दुर्घटना घडली कशी? असा प्रश्न उपस्थित झाला आहे
.दुर्घटनेनंतर मंत्री, डीजीपी सर्वांनी घटनास्थळावर धाव घेतली आहे. या सत्संगाची परवानगी घेण्यात आली होती. हजारो जणांची गर्दी घटनास्थळी जमणार होती. परंतु त्यासाठी केवळ 40 पोलिसांचा बंदोबस्त होता, असा दावा केला जात आहे. तसेच रुग्णवाहिका किंवा डॉक्टरांची नियुक्ती करण्यात आली नव्हती. भोले बाबाचे सत्संग संपल्यानंतर धावपळ सुरु झाली. चेंगराचेंगरी झाली. एकावर एक दबून लोकांचा मृत्यू होऊ लागला. त्या ठिकाणी चिखलही झाला होता.
भाविक चिखलात पडत होते. एकावर दुसरा येऊन पडत होता. जे खाली पडले ते पुन्हा उठू शकले नाही.संपूर्ण देशाला हादरवणाऱ्या या घटनेनंतर भोले बाबा फरार झाले आहेत. प्रत्यक्षदर्शीने दिलेल्या माहितीनुसार, फुलराई मैदानावर उघड्यावर सत्संगाचे आयोजन करण्यात आले होते. उत्तर प्रदेश, हरियाणा आणि राजस्थानमधील 50,000 हून अधिक बाबांचे अनुयायी यात सहभागी आले होते. सत्संग संपल्यावर भाविक पुढे आले आणि बाबांजवळ जमा झाले.
त्यांचे आशीर्वाद घेऊ लागले. त्यांच्या चरणांची धूळ घेऊ लागले. त्या ठिकाणी एक खड्डा होता. सुरुवातील धक्का लागल्यावर काही जण पडले. त्यानंतर धावपळ सुरु झाली. जे पडले ते परत उठू शकले नाही. गर्दी त्यांच्या आंगावरुन चालत होती. पाहता, पाहता मोठी दुर्घटना घडली, असे प्रत्यक्षदर्शीने सांगितले.