एअर इंडिया विमान अपघाताच्या तपासाला मोठं यश

एअर इंडियाच्या विमानाचा (Air India plane) १२ जून रोजी अपघात झाला. अहमदाबादच्या आंतरराष्ट्रीय विमानतळावरुन लंडनला जाण्यासाठी निघालेलं विमान टेक ऑफनंतर अवघ्या मिनिटभरात कोसळलं. या अपघातात एकूण २७४ जणांचा मृत्यू झाला. या दुर्घटनेचा तपास करणाऱ्या एअरक्राफ्ट ऍक्सिडंट इन्व्हेस्टिगेशन ब्युरोच्या (एएआयबी) हाती मोठं यश आलं आहे.

विमानाच्या ब्लॅक्स बॉक्समधून कॉकपिट व्हॉईस रेकॉर्डर (सीव्हीआर) आणि फ्लाईट डेटा रेकॉर्डर (एफडीआर) सुरक्षित बाहेर काढण्यात आलेला आहे. या दोन्ही उपकरणांमधील डेटा डाऊनलोड केला गेला आहे. त्याचं विश्लेषण आता सुरु करण्यात आलं आहे. २४ जूनला विमानाचा ब्लॅक बॉक्स अहमदाबादहून दिल्लीला आणण्यात आला.

ब्लॅक बॉक्स २४ जूनला अहमदाबादहून दिल्लीला आणण्यात आला. एअरक्राफ्ट ऍक्सिडंट इन्व्हेस्टिगेशन ब्युरोच्या प्रयोगशाळेत तो उघडण्यात आला. यानंतर क्रॅश प्रोटेक्शन मॉड्युल (सीपीएम) सुरक्षितपणे बाहेर काढण्यात आलं. यातील मेमरी यशस्वीरित्या ऍक्सेस करुन डेटा डाऊनलोड करण्यात आला.

सीव्हीआर म्हणजे कॉकपिट व्हॉईस रेकॉर्डर. वैमानिकांमधील संवाद आणि कॉकपिटमधील आवाज यामध्ये रेकॉर्ड होतात. अपघाताआधी नेमकी परिस्थिती काय होती, याची माहिती सीव्हीआरमुळे मिळते. एफडीआरचा अर्थ फ्लाईट डेटा रेकॉर्डर असा होतो. विमानाचा वेग, उंची इंजिनाची स्थिती, दिशा आणि अन्य तांत्रिक सूचना आणि माहितीची नोंद एफडीआरमध्ये होत असते.

सीव्हीआर आणि एफडीआरमध्ये रेकॉर्ड झालेल्या माहितीच्या आधारे अपघाताआधीचा पूर्ण घटनाक्रम समजून घेण्याचे प्रयत्न सुरु आहेत. सीव्हीआर, एफडीआरमधील माहितीचं विश्लेषण करुन अपघाताच्या कारणांचा शोध घेतला जात आहे. तांत्रिक बिघाड, वैमानिकाची चूक किंवा अन्य कोणत्या कारणामुळे अपघात झाला, याचा शोध घेतला जात आहे. हवाई सुरक्षा अधिक मजबूत करण्याच्या दृष्टीनं हा तपास केला जात आहे.