सध्या झिका व्हायरस यामुळे नागरिकांमध्ये भीतीचे वातावरण आहेच. अशातच पुणे शहरापाठोपाठ आता सांगली शहरात देखील झिका व्हायरल ने एन्ट्री केलेली आहे. सांगली शहरातील मध्यवर्ती असलेल्या शासकीय रुग्णालय परिसरातच पहिला रुग्ण आढळून आला आहे. 82 वर्षीय वृद्ध व्यक्तीचा रिपोर्ट पॉझिटिव्ह आला आहे. त्याच्यावर खाजगी रुग्णालयात उपचार सुरू असून त्याची प्रकृती स्थिर आहे. झिका रुग्णांमुळे मनपाची आरोग्य यंत्रणा खडबडून जागी झाली असून या परिसरातील 1000 घरांच्या सर्वेक्षणासाठी दहा पथके नियुक्त केली आहेत.
दिनांक 4 जुलैला एका वृद्धाला ताप, खोकला व अशक्तपणा आला होता. त्याच्यावर खाजगी डॉक्टरांच्या मार्फत उपचार सुरू होते. डॉक्टरांनी डेंग्यू, चिकनगुनिया सह काही चाचण्या केल्या होत्या. पण या चाचण्या निगेटिव्ह आल्या. तर सहा जुलैला कोरोना चाचणी देखील करण्यात आली तरी देखील ती निगेटिव्ह आली होती.
शरीरात ताप कमी होत नसल्याने दिनांक ८ जुलै रोजी फिव्हर पॅनेल मल्टीप्लेक्स पीसीआर ही चाचणी खाजगी लॅबद्वारे करण्यात आली. ९ जुलै रोजी या टेस्ट तपासणीचा अहवाल आला. त्यामध्ये झिका व्हायरसचे निदान झाले. झिका बाधित वृद्ध व्यक्तीवर खाजगी रुग्णालयात उपचार सुरू आहेत.