स्वराज्य संघटनेचे अध्यक्ष संभाजीराजे छत्रपती विशाळगडावरील अतिक्रमाणावरून चांगलेच आक्रमक झाले आहेत. या गडावरील अतिक्रमण लवकरात लवकर हटवावे, अशी मागणी त्यांनी केली आहे. याच मागणीला घेऊन संभाजीराजे काल विळागडावर जाण्याचा निर्धार केला होता. त्यानंतर गडावर तोडफोड आणि दगडफेकीच्या घटना घडल्या. मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी या प्रकाराची गंभीर दखल घेतली आहे. त्यांनी काल मध्यरात्री कोल्हापुरात येऊन विशाळगडाची पाहणी केली आहे.
मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी कोल्हापुरात जाऊन मध्यरात्री विशाळगडाची माहिती घेतली आहे. मिळालेल्या माहितीनुसार मध्यरात्री एक वाजता शिंदे कोल्हापुरात आले होते. त्यांनी आपल्या या दौऱ्यात कोल्हापूरच्या आयजींकडून विशाळगडाबाबत तसेच येथील परिस्थिती माहिती घेतली आहे. तसेच कोणतीही अनूचित घटना घडू नये यासाठी त्यांनी आवश्यक तो बंदोबस्त करावा, असे सांगितले आहे. त्यांनी येथील कायदा आणि सुव्यवस्थेबाबतही आयजींसोबत चर्चा केली आहे. विशेष म्हणजे एकनाथ शिंदे हे पंढरपूरच्या दौऱ्यावर होते. मात्र त्यांनी अचानक आपला मोर्चा वळवून रात्री एक वाजता थेट कोल्हापूरची वाट धरली आणि विशाळगडाच्या अतिक्रमाणाच्या पार्श्वभूमीवर निर्माण झालेल्या परिस्थितीवर चर्चा केली.
विशाळगडावरील अतिक्रमण हटवण्याची मागणी घेऊन 14 जुलै रोजी काही शिवभक्त विशाळगडावर गेले होते. यावेळी गडावर तोडफोडीच्या आणि दगडफेकीच्या घटना घडल्या. या घटनांचे काही व्हिडीओ समोर आले आहेत. दुसरीडे विशाळगडावरील स्थानिकांनी मारहाण झाल्याचा आरोप केला. या संपूर्ण प्रकारामुळे येथे तणावाचे वातावरण निर्माण झाले होते. पोलिसांचा मोठा फौजफाटा असूनही या तोडफोडीच्या घटना घडल्या होत्या. या सर्व घडामोडींच्या पार्श्वभूमीवर मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या कोल्हापूर दौऱ्याला विशेष महत्त्व आले आहे.