नशेच्या इंजेक्शनची विक्री करणाऱ्या टोळीचा पर्दाफाश!

शरीरसौष्ठव वाढीचे कारण देऊन नवीन युवक व महाविद्यालयात शिक्षण घेणाऱ्या विद्यार्थ्यांना मेफेनटरमाइन सल्फेट या नशेच्या इंजेक्शनची बेकायदेशीर विक्री प्रकरणाचा विटा पोलीसांनी रविवारी पर्दाफाश केला.विटा शहर व आसपास महाविद्यालय परिसरात युवकांना मेफेनटरमाइन सल्फेट या इंजेक्शनमुळे शरीरसौष्ठव वाढत असल्याचे सांगून तरूणांना बेकायदेशीर नशेच्या इंजेक्शनची विक्री केली जात असल्याची तक्रार विट्याचे पोलीस निरीक्षक शरद मेमाणे यांना मिळाली.

त्यानंतर हवालदार उत्तम माळी यांच्यासह पोलीस पथकाने सापळा लावला. त्यावेळी विटा येथे कंपाऊंडरचे काम करणारा दिलीप ठोंबरे याला ताब्यात घेतल्यानंतर त्याच्याकडे मेफेनटरमाइन सल्फेट इंजेक्शनच्या १६ सीलबंद बाटल्या सापडल्या.

त्यावेळी पोलीसांनी त्याची कसून चौकशी केली असता या प्रकरणात त्याला मदत करणाºया सुशांत जाधव व अमरदिप भंडारे या दोन साथीदारांची नावे निष्पन्न झाली.

त्यामुळे पोलीसांनी सुशांत जाधव याला तासगावमधून तर अमरदिप भंडारे याला कार्वे येथून ताब्यात घेऊन अटक केली. विटा पोलीसांनी तरूणांना बेकायदेशीर नशेच्या इंजेक्शनची विक्री करणाऱ्या टोळीचा पर्दापाश केला आहे. मात्र, हे इंजेक्शन संशयित तीघेजण कोठून खरेदी करीत होते, याचा मुख्य तपास करून त्यांच्याही मुसक्या आवळण्याचे विटा पोलीसांसमोर आव्हान आहे.