सध्या अनेक भागात गुन्हेगारी प्रकारात खूपच वाढ झालेली आहे. राजेरोसपणे अवैद्य धंदे सुरु असल्याने सर्वसामान्य नागरिकांमध्ये भीतीचे वातावरण पसरल्याचे दिसतच आहे. विटा येथे एमडी ड्रग्ज सापडल्याने देखील नागरिकांमध्ये भीती निर्माण झालेली आहे. जनतेतून नाराजीचा सूर उमटत आहे.विट्यातील एमडी ड्रग्ज कारखाना प्रकरणातील सर्व संशयितांची पोलिस कोठडी आज, बुधवार, दि. 12 फेब्रुवारीस संपणार आहे. एकूणच या गुन्ह्याची व्याप्ती पाहता या प्रकरणातील सर्व संशयितांवर पीएलएमए कायद्यांतर्गत कारवाईची मागणी जनतेतून होत आहे.
या प्रकरणी रहुदीप बोरिचा (रा. कोसंबा, जि. सुरत), सुलेमान शेख (रा. बांद्रा, मुंबई), बलराज अमर कातारी (24, रा. विटा), जितेंद्र परमार, अब्दुलरज्जाक शेख, सरदार पाटील या सहा संशयितांशिवाय कारखाना भाडेतत्त्वावर देणार्या विट्यातील गोकुळा पाटील या महिलेलाही पोलिसांनी अटक केली होती. या सर्वांची पोलिस कोठडी उद्या, 12 जानेवारीपर्यंतच आहे. आजवर जिल्ह्यात काही ठिकाणी ड्रग्जचे साठे सापडले. त्यावर कारवाई होऊन प्रकरण न्यायालयापर्यंत जाऊन चार-आठ दिवसात शांत होत असे. ज्यांच्यावर कारवाई व्हायची, असे लोक आज जामिनावर बाहेर आहेत. संशयित ड्रग पेडलर (विकणारी) मंडळी बिनधास्त वावरत आहेत. तसेच याही प्रकरणात होण्याची शक्यता वर्तविली जात आहे.
ड्रग मेकिंग आणि ट्रॅफिकिंग म्हणजे अमली पदार्थ तयार करणे आणि त्याची वाहतूक करणे, यासाठी सन 2002 मध्ये तयार केलेला प्रिव्हेन्शन ऑफ मनी लाँडरिंग अॅक्ट म्हणजेच पीएलएमए कायदा या प्रकरणात का लागू होत नाही? कारण, अवैध आर्थिक व्यवहार (मनी लाँडरिंग) हा एक गंभीर आर्थिक गुन्हा आहे. ज्याचा वापर मोठ्या आणि भुरट्या अशा दोन्ही प्रकारच्या गुन्हेगारांद्वारे होऊ शकतो. कमी कष्टात बेकायदेशीरपणे मोठ्या प्रमाणात पैसे कमावण्याच्या भानगडीत अमली पदार्थांची तस्करी होऊ शकते. अशा प्रकारची तस्करी दहशतवादी लोकांपर्यंतही जाऊ शकते.
पीएलएमए कायद्यातील कलम 3 अन्वये जाणीवपूर्वक किंवा अनवधानाने, प्रत्यक्ष किंवा अप्रत्यक्षरित्या गुन्हेगारीतून पैसा कमवणार्यांविरोधात आणि या प्रक्रियेत सहभागी असलेल्या सर्व लोकांविरोधात या कायद्यांतर्गत एफआयआर नोंद केली जाऊ शकते. त्यामुळे विटा एमडी ड्रग्ज कारखाना प्रकरणातील सातही आरोपींविरोधात पीएलएमए कायद्यांतर्गत नव्याने गुन्हे दाखल करण्यात यावेत, अशी मागणी होत आहे.