चार किलोमीटरची पायपीट थांबली! ऐनवाडीमध्ये पहिल्यांदाच बसचे आगमन

गुहागर-विजापूर मार्गावरील तामखडी फाट्यापासून चार किलोमीटर अंतरावर असलेल्या खानापूर तालुक्यातील ऐनवाडी या गावात आजपर्यंत कधीच बस आली नव्हती. या गावातील विद्यार्थ्यांना व गावकऱ्यांना शिक्षणासाठी व खरेदीसाठी खानापूर व विटा या ठिकाणी जाण्यासाठी चार किलोमीटर पायपीट करून तामखडी येथे येऊन तिथून बसने त्यांना प्रवास करावा लागत असे.

ऐनवाडी येथील अगस्ती विद्यालयाने आयएसओ मानांकनासह महाराष्ट्र शासनाच्या मुख्यमंत्री स्वच्छ सुंदर शाळा अभियानात खानापूर तालुक्यात प्रथम क्रमांक पटकाविला आहे. त्यामुळे या विद्यालयाकडे जखिणवाडी, जाधववाडी, लिंबगाव, नरसिंहपूर, घोटी, रेवणगाव या गावातून विद्यार्थी या शाळेत आता प्रवेश घेऊ लागले आहेत.

सर्वसामान्य कुटुंबातील या विद्यार्थ्यांची येण्या जाण्याची सोय व्हावी यासाठी ग्रामविकास शिक्षण संस्थेचे अध्यक्ष बाळासाहेब जाधव व मुख्याध्यापक संतोष नाईक यांनी एसटी महामंडळाकडे पाठपुरावा करून बसची सोय केली आहे. त्यामुळे विटा आगारातून बस सुरू केली असून, गावात पहिल्यांदाच आलेल्या बसचे शाळेच्या व ग्रामस्थांनी स्वागत केले.