इचलकरंजीत पूर पाहण्यासाठी मोठ्या पूलावर प्रचंड गर्दी!

कोल्हापूर जिल्ह्यात मुसळधार पाऊस पडत असल्यामुळे कृष्णा व पंचगंगेला पूर परिस्थिती निर्माण झाली आहे. दोन्ही नद्या इशारा पातळीकडे जात आहे. तर इचलकरंजी शहराची पंचगंगा नदी सध्या 63 फुटावर वाहू लागले. तर इशारा पातळी 69 फुटांवर आहे. गणपती मंदिर, महादेव मंदिर, स्मशानभूमी पूर्ण खाण्याखाली गेले. तर पूर पाहण्यासाठी नागरिक मोठ्या पूलावर गर्दी करू लागले आहेत. तसेच लहान पूलावरून पाणी गेल्यामुळे पूल वाहतुकीसाठी बंद करण्यात आल आहे.

इचलकरंजी शहरासह गेल्या दोन दिवसापासून घाटमाथ्यावर मुसळधार पाऊस पडत आहे. गगनबावडा, राधानगरी, आजरा, मलकापूर, शाहूवाडी या आदी भागांमध्ये पाऊस पडत असल्यामुळे पंचगंगेला पूर परिस्थिती निर्माण झाली आहे. सध्या कोल्हापूरची पंचगंगा नदी 39 फुटावर वाहू लागली तर इशारा पातळी 69 वर आहे. तर इचलकरंजी पंचगंगा नदी 63 फुटांवर वाहू लागले तर इशारा पातळी 69 आहे.

पूर पाहण्यासाठी, सेल्फी घेण्यासाठी नागरिक मोठ्या प्रमाणात नदी परिसरात गर्दी करू लागले आहेत. त्यामुळे मोठ्या पुलावर वाहतुकीस अडथळा होऊ लागला आहे. पोलिसांनी बंदोबस्त ठेवला आहे. तर अलमट्टी धरणातून सध्या तीन लाख क्यूसेकने पाणी सोडण्यात येत आहे. त्यामुळे कोल्हापूर सांगली शिरोळ इचलकरंजी या भागातील पूरग्रस्तांना मोठा दिलासा मिळाला आहे. अलमट्टी धरण सध्या 80 टक्के भरले आहे.

पुराचे पाणी आता नागरी वस्तीकडे जाऊ लागले आहे त्यामुळे प्रशासन सज्ज झाले आहे. तर इचलकरंजी महानगरपालिकेतर्फे आपत्ती व्यवस्थापन तैनात करण्यात आले. तसेच पुरग्रस्तांना राहण्यासाठी योग्य ती तयारी करण्यात आली. तर सर्व जनावरांना चारा छावणी तयार ठेवण्यात आली आहे. तसेच शिरोळ, कोल्हापूर या ठिकाणी एनडीआरएफ च्या टीम तैनात करण्यात आल्या आहेत. पण आज सकाळपासून पावसाने थोडी विश्रांती घेतल्यामुळे थोडासा दिलासा मिळाला आहे.