हातकणंगले तालुक्यातील अंबप येथे राजेंद्र कांबळे यांचे घर पावसाने कोसळले. यामध्ये सुदैवाने कोणतीही जीवितहानी झाली नाही. पण या कुटुंबाचे सुमारे तीन लाख रुपयांचे नुकसान झाले.अंबप येथील माळकरी गल्लीमध्ये राजेंद्र सखाराम कांबळे यांच्या घरी त्यांची भाची अर्चना कांबळे व त्यांचे कुटबीय राहत होते. वीट बांधकाम केलेलं सुमारे २५ वर्षांपूर्वीचे घर होतं. पाच दिवसांपासून कोसळणाऱ्या संतधार पावसामुळे आज (बुधवार) सकाळी सहा वाजण्याच्या सुमारास कांबळे यांचे घर अचानक कोसळले.
सकाळची वेळ असल्याने सर्व कुटुंबीय घरातच होते. अचानक आवाज होऊ लागल्याने सर्वजण बाहेर आले. यानंतर काही क्षणातच घर कोसळले. यामध्ये सुदैवाने कोणतीही जीवितहानी झाली नाही. यावेळी डोळ्यासमोर घर कोसळल्याने कुटुंबीय भयभीत झाले होते. यामुळे कांबळे कुटुंब बेघर झाले आहे. दरम्यान सरकारी दवाखान्याजवळ शिवाजी माळी यांच्या घराची भिंतीचीही पडझड झाली आहे.