नदी वेस नाका ते पंचगंगा नदी या रस्त्यावर दगडी कमानी असलेला पूल होता. त्या पुलाला यशोदा पूल म्हणून ओळखले जात होते. काही वर्षांपूर्वी नव्याने बांधण्यात आलेल्या पुलामुळे यशोदा पूल पाडण्यात आला. त्या ठिकाणी मोठे नळ टाकून पाणी निचऱ्याची व्यवस्था करून पुलाचा रस्ता रुंद करण्यात आला. मात्र पावसाळ्यात पूर परिस्थिती निर्माण झाल्यानंतर त्या
नळातून योग्य प्रमाणात पाण्याचा निचरा होत नसल्याने पुराचे पाणी प्रमाणापेक्षा जास्त वेळ तुंबून राहत असल्याने त्याचा फटका मळे भागातील घरांना बसतो.
बऱ्याच घरामध्ये पाणी शिरूर नुकसान होत असल्याने यशोदा फुलाच्या ठिकाणी पूर्वत कमान पूल बांधावा, अशी मागणी सातत्याने नागरिकांतून तसेच शेतकरी वर्गातून केली जात होती. त्यानंतर शासनाने जुलै २०२२ च्या अर्थसंकल्पात यशोदा पूल येथे बॉक्स सेल बांधण्यासाठी तसेच नदीवेस नाका ते पंचगंगा नदी रस्ता काँक्रीट करण्यासाठी ५ कोटी १४ लाख रुपये निधी मंजूर करण्यात आला होता. सदर कामासाठी संबंधित मक्तेदाराला एक वर्षाची मुदत दिली होती. नियोजनाचा अभाव यशोदा पुलाचे बांधकाम सुरू करण्या अगोदर पावसाळ्याचा अंदाज घेणे आवश्यक होते आणि पावसाळ्यापूर्वी पुलाचे काम पूर्ण झाले असते तर कर्नाटक, हुपरी या भागाची वाहतूक सुरू झाली असती.
मात्र नियोजन नसल्यामुळे सदरची वाहतूक बंद करण्याची वेळ आली आहे. त्याचा फटका सर्वसामान्यांना बसला आहे. चुकीच्या वेळेमुळे पाणी रस्त्यावर आल्याने संपूर्ण कर्नाटकसह हुपरी, शिरदवाड या मार्गाकडे जाणारी वाहतूक गेल्या काही वर्षानंतर बंद करण्याची वेळ आली. नियोजन अभावी करण्यात आलेल्या या कामामुळे नदीपलीकडील नागरिकांना त्याचा नाहक त्रास सहन करावा लागत आहे. पुर ओसरल्यानंतर पुलाच्या बांधकामाची काय स्थिती असेल हे पाणी ओसरल्यानंतरच समजेल.