नाले, ओढे, सारण गटारींची तातडीने स्वच्छता करण्याच्या सूचना

सध्या इचलकरंजीत पंचगंगा प्रदूषण प्रश्न जोर खात आहे. या प्रदुषणामुळे शहर वासियांना पाण्याच्या टंचाईला सामोरे जाववे लागत आहे. तसेच अनेक आजारांना देखील तोंड द्यावे लागत आहे. सन २०१९ आणि २०२१ साली आलेल्या महापूराच्या परिस्थितीचा पुर्वानुभव लक्षात घेता आयुक्त तथा प्रशासक ओमप्रकाश दिवटे यांच्या निर्देशानुसार इचलकरंजीतील संभाव्य पुर परिस्थितीच्या पार्श्वभूमीवर महानगरपालिका उपायुक्त प्रसाद काटकर यांनी आपत्ती व्यवस्थापन अंतर्गत मान्सूनपूर्व तयारीचा आढावा घेतला.

आढावा बैठकीत उपायुक्त यांनी मान्सूनपूर्व तयारीच्या अनुषंगाने संबंधित विभाग प्रमुखांना आवश्यकतेनुसार आदेश देताना शहरातील धोकादायक इमारत मालकांना नोटीस देणे, धोकादायक झाडे किंवा त्याच्या फांद्या तोडण्यासाठी आवश्यक प्रक्रिया तातडीने पूर्ण करणे, शहरातील मोठे नाले, ओढा यांचे रुंदीकरण / खोलीकरण तसेच सारण गटारींची स्वच्छता करणे, आपत्ती व्यवस्थापन अंतर्गत सर्व साहित्य आणि मशिनरी सुस्थितीत ठेवणे, आवश्यकतेनुसार मनुष्यबळ आदेश काढणे आदी सूचना करताना आपत्कालीन परिस्थितीत कोणत्याही विभागप्रमुखाने मुख्यालय सोडू नये, अत्यावश्यक कारणाशिवाय कोणत्याही अधिकारी-कर्मचाऱ्यांना रजा देव नयेत.

तसेच आपला मोबाईल फोन बंद ठेवु नये असे सक्त आदेश उपायुक्त प्रसाद काटकर यांनी सर्व विभाग प्रमुखांना दिले. या बैठकीत सहा. आयुक्त तथा कामगार अधिकारी विजय राजापुरे, उप शहर अभियंता राधिका हावळ, आरोग्याधिकारी डॉ. सुनिलदत्त संगेवार, स्वच्छता निरीक्षक महादेव मिसाळ, उद्यान पर्यवेक्षक सुनील बेलेकर, अग्निशमन अधिकारी सौरभ साळुंखे आणि संजय कांबळे आदी उपस्थित होते.